Electric Scooter Fire Reason: देशात ई-वाहनांना वारंवार आग लागण्याच्या आणि बॅटरीमध्ये स्फोट होण्याच्या काही अनेक घटना समोर आल्या आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना वेळो वेळी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर यामागे नक्की काय कारण आहे याचा शोध घेतला जात होता. केंद सरकारने याचा तपास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने आता अहवाल सादर केला आहे ज्यात कारण स्पष्ट झाले आहे.

काय आहे कारण?

इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या सदोष पेशींमुळे आगीच्या घटना घडत असल्याचे केंद्राने स्थापन केलेल्या चौकशी समितीला आढळून आले आहे. आता असे मानले जात आहे की केंद्र सरकार या वाहनांच्या उत्पादकांवर बॅटरीचा दर्जा सुधारण्यासाठी दबाव आणू शकते. चौकशी समितीला देशातील जवळपास सर्वच इलेक्ट्रिक दुचाकी आगीच्या घटनांमध्ये बॅटरी सेल किंवा डिझाइनमध्ये दोष आढळला आहे. ओकिनावा ऑटोटेक, बूम मोटर, प्युअर ईव्ही, जितेंद्र ईव्ही आणि ओला इलेक्ट्रिक यांच्या ई-स्कूटर्समधील ईव्ही आग आणि बॅटरी स्फोटाच्या घटना लक्षात घेऊन ही समिती गेल्या महिन्यात स्थापन करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-वाहन क्षेत्रातील तज्ञ आता त्यांच्या वाहनांशी संबंधित बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधतील आणि उपाय सुचवतील.

आतापर्यंत घडल्या आहेत अनेक घटना

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात अलीकडेच एका ई-स्कूटरचा स्फोट होऊन एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले होते. अशीच दुसरी घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे घडली. येथे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत सुमारे २५ ई-स्कूटरमध्ये आग किंवा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

इंधन दरवाढीमुळे वाढली लोकप्रियता

पेट्रोल महाग झाल्यानंतर देशात ई-वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे, तर त्यात आग लागण्याच्या आणि खराब होण्याच्या घटनांचा विपरीत परिणाम होत आहे. नुकतेच, महाराष्ट्रातील परळी येथे एका व्यक्तीने कंटाळून त्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरला गाढवाला बांधून त्याची मिरवणूक काढली होती.

Story img Loader