इलेक्ट्रिक कार प्रमाणे इलेक्ट्रिक स्कुटरलाही मागणी वाढली आहे. महागड्या इंधनामुळे लोक आता इलेक्ट्रिक स्कुटरकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक वाहन कमी खर्चात अधिक मायलेज देते. तसेच ते पर्यावरणपुरक देखील आहे. त्यामुळे साहजिकच विक्री वाढण्याची शक्यता होती. मिळालेल्या आकड्यांनुसार इलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात ६८ हजार २३४ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. या महिन्यात ई स्कुटरच्या विक्रीमध्ये २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रीच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिकने नवा विक्रम केला आहे. मासिक वाढीच्या बाबतीत कंपनीने ५३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ऑक्टोबर महिन्यात ओलाने नवी एस १ एअर स्कुटर लाँच केली होती आणि याच महिन्यात कंपनीने स्कुटर विक्रीत नवा विक्रम केला. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक ई स्कुटर विकल्याचा विक्रम केला आहे. ओलाने ऑक्टोबर महिन्यात १५ हजार ९५ ई स्कुटर्सची विक्री केली.
(रॉयल इन्फिल्डचे चाहते वाढले, सप्टेंबर महिन्यात ‘या’ ३ बाईक्सची सर्वाधिक विक्री)
३८ टक्क्यांच्या वृद्धीसह दुसरे स्थान ओकिनावाने मिळवले. कंपनीने ११ हजार ७५४ युनिट्सची विक्री केली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर एम्पियर आहे. कंपनीने ८ हजार ८१२ युनिट्सच्या विक्रीसह ३६ टक्क्यांची वाढ नोंदवली. त्यानंतर टीव्हीएस मोटर ३१ टक्के आणि बजाज ऑटोने विक्रीच्या बाबतीत २४ टक्क्यांची वाढ नोंदवली. तेच विक्रीच्या बाबतीत अथर एनर्जीने ११ टक्क्यांची वाढ नोंदवली.
सप्टेंबरमध्येही ओलाच अव्वल
सप्टेंबरमध्येही ओलाने विक्रमी स्कुटर विक्री केली होती. सप्टेंबर दरम्यान कंपनीने फेस्टिव्हल ऑफरमध्ये १० हजार रुपयांचा डिस्काउंट दिला होता. यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. ई स्कुटरची बुकिंग वाढली होती. ई स्कुटरच्या यशानंतर आता ओला लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. बॅटरीच्या बाजारपेठेतही कंपनी आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ओला लवकरच बॅटरीचे नवे ब्रँड लाँच करू शकते.
(आल्टोपेक्षा लहान असेल MG AIR EV, जाणून घ्या रेंज आणि किंमत)
ओला ई स्कुटरचे फीचर
ओला एस १ इलेक्ट्रिक स्कुटरची मोटर ८.५ किलोवॉटची उर्जा निर्माण करते. स्कुटरमध्ये १.९ किलोवॉटची बॅटरी मिळते. स्कुटर ३ सेकंदात ४० किमी प्रति तासाचा वेग गाठते. वाहनाची टॉप स्पीड ११५ किमी प्रति तास असल्याचा कंपनीचा दावा आहे. सिंगल चार्जमध्ये स्कुटर १५० किमी पर्यंतची रेंज देते. स्कुटरमध्ये नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर हे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतात.