Tips To Care For Electric Car In Summer : थंडी सरून आता वाढत्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. दिवसभर लोकांना कडक उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचा माणसांप्रमाणे आता वाहनांवरही परिणाम होत आहे. उन्हाळ्यात वाहनांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यातही विशेषत: इलेक्ट्रिक वाहनाची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कारण- तीव्र तापमानामुळे इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी परफॉर्मन्स आणि लाइफवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यासाठीच आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची काळजी कशी घ्यायची याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

उन्हाळ्यात इलेक्ट्रिक कारची काळजी कशा प्रकारे घ्यावी?

१) बॅटरीचे तापमान

इलेक्ट्रिक कार थेट सूर्यप्रकाशात पार्क करणे टाळा. गाडी सावली असलेल्या ठिकाणी किंवा गॅरेजमध्ये पार्क करा. जर हे शक्य नसेल, तर विंडो शेड्स किंवा कव्हर वापरा. बॅटरी जास्त गरम होण्यापासून वाचवण्यासाठी कार जास्त वेळ उन्हात उभी करू नका. जास्त उन्हामुळे गाडीच्या बॅटरीचे लाइफ कमी होऊ शकते.

२) चार्जिंग करताना घ्या काळजी

रात्रीचे तापमान दिवसाच्या तुलनेत कमी असते, ज्यामुळे तुम्ही बॅटरी अधिक प्रभावी आणि सुरक्षितपणे चार्ज करू शकता. उन्हाळ्यात जलद चार्जिंगमुळे बॅटरी गरम होऊ शकते, ज्यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात बॅटरी ८०-९० टक्क्यांपर्यंत चार्ज करणे चांगले असते. कारण- पूर्ण चार्ज केल्यावर जास्त तापमान बॅटरीवरील दाब वाढवू शकते.

३) इंटेरियर आणि बॅटरी कूलिंग सिस्टीम

उन्हाळ्यात चांगल्या रेंज आणि परफॉर्मन्ससाठी तुमची इलेक्ट्रिक कार इको मोडमध्ये चालवा. असे केल्याने तुम्हाला केवळ अधिक रेंज मिळणार नाही, तर कारचा परफॉर्मन्सदेखील सुधारेल. त्याशिवाय एसी चालू हाय स्पीडने चालू करणे टाळा. तो नेहमी मीडियम लेव्हलवर ठेवा. एसी हाय स्पीडने चालू केल्याने बॅटरीचा वापर वाढतो आणि रेंजदेखील कमी होते.

४) वाहन जास्त वेगाने चालवू नका

जास्त वेगाने इलेक्ट्रिक वाहन चालवणे टाळा. जास्त वेगाने चालवल्याने मोटर आणि बॅटरीवर जास्त भार पडतो, ज्यामुळे जास्त उष्णता निर्माण होते. तसेच वारंवार ब्रेक लावणे टाळा, असे केल्याने बॅटरीवर भार पडतो.

सुरळीत गाडी चालवा आणि जास्तीत जास्त रिजनरेटिव्ह ब्रेकिंग वापरा. बॅटरी मॅनेजमेंट आणि थर्मल कंट्रोल सुधारण्यासाठी ईव्ही उत्पादक वेळोवेळी अपडेट्स जारी करतात. त्यामुळे तुमच्या कारचे सॉफ्टवेअर अपडेट आहे की नाही याची खात्री करा. त्याशिवाय इलेक्ट्रिक कारने सतत लांब पल्ल्याचा प्रवास करणे टाळा, बॅटरी थंड होण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मधे मधे ब्रेक घ्या.

५) टायर आणि ब्रेकची काळजी घ्या

उन्हाळ्यात टायरवरील दाब वाढू शकतो, ज्यामुळे टायर फुटण्याचा धोका असतो. कंपनीने सांगितल्याप्रमाणेच सर्व टायर्समध्ये हवा भरा. उच्च तापमान ब्रेक फ्लुइडवर परिणाम करू शकते. म्हणून तुमची कार बेक्रिंग सिस्टीम वेळोवेळी तपासत राहा.