बापू बैलकर
किआ मोटर्सने प्रशस्त, आरामदायी व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा कॅरेन्स हा एक सहा व सात आसनी कारचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही कार चालवताना सुरक्षित भावना कायम राहते. एक आधुनिक सुविधांनीयुक्त कार खरेदीचा विचार करीत असाल, तर हा पर्याय तुमच्या यादीत असावा.
किआ मोटर्सने कॅरेन्सच्या रूपाने परवडणाऱ्या कारचा विचार करीत असलेल्या ग्राहकांना एक चांगला पर्याय दिला आहे. कंपनीने मंगळवारी ८.९९ ते १६.९९ (एक्स—शोरूम, संपूर्ण भारतात) या कारच्या किमती जाहीर केल्या आहेत. सात आसनी पर्याय देण्यात किआने उशीर केला, असा एक मतप्रवाह आहे. मात्र या प्रकारातील कार या कमी किंवा अधिक बजेट असलेल्या आहेत. मधला पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक संधी आहे. कॅरेन्स कार दिसायला कशी आहे, कोणत्या सुविधा आहेत. याबाबत कारप्रेमींपर्यंत बरीचशी माहिती आतापर्यंत उघड झाली आहे. १४ जानेवारी रोजी नोंदणी सुरू झाल्यापासून या कारसाठी १९,०८९ नोंदणीही झाली आहे. त्यामुळे कौटुंबिक प्रवासाचा विचार करीत ही कार चालवल्यानंतर आलेला अनुभव महत्वाचा आहे.
सुरक्षा
या कारमध्ये चालकासह प्रत्येक सहप्रवाशाच्या सुरक्षेसह कारच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे. दहा बळकट उच्च सुरक्षा पॅकेज दिले असून सहा एयरबॅग दिल्या आहेत. अपघात पश्चात सुरक्षा सुविधांसह अपघात पूर्व सुरक्षा प्रणालीही दिल्या आहेत. यात इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ईएससी), वाहन स्थिरता व्यवस्थापन (वीएसएम), हिल—असिस्ट कंट्रोल (एचएसी), डाऊनहिल ब्रेक कंट्रोल (डीबीसी), ब्रेक असिस्ट सिस्टम (बीएएस), अँटी—लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), रियर पार्किंग सेन्सर्स, हायलाइन टीपीएमएस आणि ऑल—व्हील डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे. त्यामुळे ही कार चालवताना अगदी सहज व सुरक्षित असल्याची भावना कायम टिकून राहते.
आरामदायी
ही कार आरामदायी असून लांबच्या प्रवासासाठी चांगला पर्यायआह. आसन व्यवस्था दर्जदार दिली आहे. तीन्ही रांगेतील आसन व्यवस्था तेवढीच दर्जदार आहे. आसनांची रचना ही चालकासह सहप्रवाशांना कुठेही गैरसोयीचे वाटत नाही. चालक व सहप्रवाशासह मागील दोन्ही रांगेतील प्रवाशांच्या गरजांचा तेवढाच विचार केलेला आहे. यात आसन गरजेनुसार मागे पुढे करता येते. अनेकदा सात आसनी कारमध्ये तिसऱ्या रांगेत बसून प्रवास गैरसोयीचा होतो. मात्र या कारमध्ये तिसऱ्या रांगेतील आसनेही गरजेनुसार हलवता येत असल्याने कुठेही गैरसोय होत नाही. शिवाय दुसऱ्या व तिसऱ्या रांगेतील आसन पूर्णपणे खाली पाडता येते. लांबच्या प्रवासात किंवा कुठे जास्त वेळ थांबा घेतल्यास थोडी विक्षांतीही शक्य होते. प्रत्येक आसन रांगेत मोबाइल चर्जिगची सुविधा दिली आहे.
कॅरेन्समध्ये वातानुकूलन यंत्रणाही सर्व प्रवाशांचा विचार करीत तेवढय़ाच क्षमतेची दिली आहे. आता थंडीचे दिवस असल्याने तिचा परिणाम नेमका सांगता येणार नाही. मात्र ती दर्जेदार आहे, हे नक्की. या करामध्ये प्रवाशांच्या डोक्यावर यासाठी सुवधिा देण्यात आल्या असल्याने संपूर्ण कारमधील वातावरण अगदी हवे तसे ठेवता येते. तसेच प्रवासात कारमध्ये बसून लॅपटॉप, टॅबचा अगदी सहज वापर करता येईल अशी व्यवस्था आहे. प्रत्येक जागेचा प्रवाशांच्या गरजा ओळखून योग्य वापर करण्यात आला आहे. यामुळे आरामदायी प्रवासाचा अनुभव येण्यात कुठेही अडचण होत नाही.
कार्यक्षमता
ही कार तीन पॉवरट्रेन पर्यायासह उपलब्ध आहे. स्मार्टस्ट्रीम १.५ पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम १.४ डी-जीडीआय पेट्रोल आणि १.५ सीआरडीआय व्ही जीटी डिझेल. तसेच ग्राहकांना तीन ट्रान्समिशन पर्यायांमधून निवड करण्याचासुद्धा पर्याय आहे. यात ६ एमटी, ७ डीसीटी आणि ६ एटी. प्रीमियम ते लक्झरी ट्रिममध्ये कार सात आसनी पर्याय देईल, तर लक्झरी प्लस ट्रिममध्ये ६ आणि ७ आसनी असे दोन्ही पर्याय आहेत. ही कार चालवताना पॉवरट्रेनचा विचार केला तर निराशा होत नाही. ही कार आम्ही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व घाटरस्त्यावरही चालवली. मात्र पीकअप चांगला आहे. खडतर रस्त्यावर थोडे धक्के जाणवतात. मात्र त्यामुळे गैरसोय होत नाही. शहरातील रस्त्यांवर तर चांगला अनुभव देते.
महत्त्वाचे
- मूव्हर सेगमेंटमधील गरजांची पूर्तता
- छोटे सनरूफ
- प्रमाण म्हणून ६ एयर बॅग, ६६ कनेक्टेड सुविधा
- तीन पॉवरट्रेन्स आणि तीन ट्रान्समिशन पर्याय
- प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या पाच ट्रिममध्ये उपलब्ध
- दणकट १० उच्च सुरक्षा सुविधा सहा आणि सात आसनी पर्यायांमध्ये उपलब्ध
- सर्वात लांब व्हीलबेस