World’s First CNG Bike Sales Report: आतापर्यंत जगात एकच ऑटो कंपनी अशी आहे, जिच्याकडे सीएनजीवर चालणारी बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. दुहेरी इंधनावर चालणारी ही बाईक प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यास मदत करते, तसेच आपला इंधन खर्च ५० टक्क्यांनी कमी करते. जगातील पहिली CNG बाईक लाँच करण्यात आली, त्यामुळे बाईक मार्केटमध्ये एकच चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे, आता या बाईकने अल्पावधीतच ५० हजारांचा विक्रीचा आकडा ओलांडला असल्याची माहिती आहे.

बजाज कंपनीने जगातील पहिली CNG बाईक Bajaj Freedom 125 लाँच करून बाईक बाजारात खळबळ उडवून दिली आहे. लाँच होताच या बाईकची मागणी झपाट्याने वाढली आहे. या बाईकमुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून दिलासा मिळाला आहे, जगातील पहिली सीएनजी Bajaj Freedom 125 ही बाईक तीन प्रकारांमध्ये आणि सात रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात १२५ सीसी बीएस६ इंजिन आहे, जे ९.३ बीएचपी पॉवर आणि ९.७ एनएम टॉर्क देते. यात फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेकसह कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम आहे. या बाईकचे वजन १४९ किलो आहे आणि त्यात दोन लिटरची इंधन टाकी आहे.

Bajaj Freedom 125 मध्ये दोन किलोचा सीएनजी टँक आहे, जो मध्यवर्ती भागात बसवला आहे. २.०-लिटर पेट्रोल टाकी सीएनजी टाकीच्या वर आणि समोर ठेवली आहे. सीएनजी आणि पेट्रोल दोन्हीसाठी एक सामान्य फिलर कॅप आहे आणि रायडर एकाच स्विचने सीएनजीवरून पेट्रोल आणि पेट्रोलवरून सीएनजीवर स्विच करू शकतो. दोन्हींचे एकत्रित सरासरी मायलेज ९१ किमी असल्याची माहिती आहे.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर टॉप दोन व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह एलईडी हेडलाइट आणि रिव्हर्स एलसीडी डिस्प्ले आहे. बजाज फ्रीडम सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये कॅरिबियन ब्लू, प्यूटर ग्रे-ब्लॅक, सायबर व्हाइट, इबोनी ब्लॅक-ग्रे, रेसिंग रेड, प्यूटर ग्रे-यलो आणि इबोनी ब्लॅक-रेड यांचा समावेश आहे.

Bajaj Freedom 125 व्हेरिएंटची किंमत १,०७,४९४ रुपयांपासून सुरू होते आणि इतर व्हेरिएंट – फ्रीडम ड्रम एलईडी आणि फ्रीडम डिस्क एलईडीची किंमत १,१२,९३५ ते १,२९,२३४ रुपयांच्या दरम्यान आहे. या किमती दिल्लीतील ऑन-रोड किमती आहेत. ही बाईक या सेगमेंटमध्ये TVS Raider 125, Hero Xtreme 125R, Bajaj Pulsar NS125 आणि Honda Shine 125 शी स्पर्धा करते.