दोन किंवा चारचाकी गाड्यांमध्ये लहानापासून मोठ्या आकाराचे वेगवेगळे भाग बसवलेले असता; ज्यामुळे वाहन सुरळीतपणे चालू राहण्यास मदत होत असते. त्यापैकी एक भाग म्हणजे अल्टरनेटर. केमिकल एनर्जीचे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करण्याचे काम अल्टरनेटर करीत असतो. गाडीमधील या महत्त्वपूर्ण भागामुळे गाडीतील इंजिन आणि इतर इलेक्ट्रिक गोष्टी चार्ज होतात. ‘अल्टरनेटर’मुळेच चालकाला गाडी सुरू करता येते आणि त्यामधील इतर गोष्टींचा वापर करता येतो. परंतु, या अल्टरनेटरमध्येच काही बिघाड झाल्यास गाडी सुरूच होत नाही किंवा भररस्त्यात गाडी बंद पडू शकते. त्यामुळे आपल्या वाहनाची वेळोवेळी काळजी घेणे, सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते.
मात्र, आता आपल्या गाडीमधील अल्टरनेटर बदलण्याची वेळ आली आहे हे कसे ओळखायचे याच्या काही टिप्स हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजतात. गाडीमधील हा भाग खराब होण्यापूर्वी तो काही संकेत देत असतो; त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हेही वाचा : नवीन वर्षात वाढणार गाड्यांचे भाव; कोणत्या गाड्यांच्या किमतीत होणार किती वाढ, जाणून घ्या
अल्टरनेटरसंदर्भात गाडी कोणते संकेत देते?
१. बॅटरी लाइट चालू होणे
गाडीच्या डॅशबोर्डवरील बॅटरी लाइट चालू झाल्यास, आपल्या अल्टरनेटरमध्ये काहीतरी गडबड आहे, असे समजावे. जर त्यामध्ये काही बिघाड असल्यास गाडीतील बॅटरीला आवश्यक तितके व्होल्टेज मिळत नाही. परिणामी कोणत्याही गोष्टी चालू होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डॅशबोर्डवरील बॅटरी लाइट चालू असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
२. दिव्यांचा प्रकाश कमी होणे किंवा मिणमिण [फ्लिकर] करणे
अल्टरनेटरमध्ये बिघाड झाल्यास बॅटरीला काम करण्यायोग्य इलेक्ट्रिक शक्ती मिळत नाही; ज्यामुळे हेडलाइट्सचा प्रकाश कमी होऊ शकतो किंवा दिवा सतत चालू-बंद म्हणजेच फ्लिकर करू शकतो. असे होत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे.
३. गाडीमधील यंत्र काम न करणे
योग्य इलेक्ट्रिसिटी न मिळाल्याने गाडीतील टीव्ही, स्पीकर्स किंवा इतर यंत्रे सुरळीतपणे काम करीत नाहीत. गाडीच्या काचा वर-खाली करण्याची गती मंदावणे, गाडीचे सनरूफ मधेच अडकणे इत्यादी समस्या उदभवू शकतात.
हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! बाईक टॅक्सी अन् रिक्षानंतर आता रॅपीडोची ‘ही’ सेवा होणार सुरु; जाणून घ्या…
४. इंजिनामधून वास येणे
जर तुम्हाला रबर किंवा वायर जळाल्यानंतर येतो तसा वास येत असल्यास त्यामागे खराब अल्टरनेटर हे कारण असू शकते. अतिवापरामुळे फ्रिक्शन म्हणजेच घर्षण निर्माण होते. परिणामी उष्णता निर्माण होऊन रबर किंवा वायर जळल्याचा वास येतो.
५. गाडी सुरू होण्यास अडथळा निर्माण होणे
गाडी व्यवस्थित चालू न होणे किंवा मधे मधे बंद पडणे हाही अल्टरनेटर बदलणे आवश्यक असल्याचा एक संकेत असू शकतो. बॅटरीला आवश्यक तितकी शक्ती वा एनर्जी न मिळाल्यास, बॅटरीमध्ये साठवून ठेवलेल्या एनर्जीचा वापर करून गाडी सुरू करावी लागते; मात्र ती सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी इंजिनामध्ये आवश्यक तितकी एनर्जी नसते आणि म्हणूनच ती बंद पडत असते.
त्यामुळे आपली गाडी उत्तम स्थितीत आणि सुरळीतपणे काम करीत राहावी, असे तुम्हाला वाटत असेल, तर या वरील पाच गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.