Bike care: अलीकडे अनेक तरुण मंडळी इतर बाईकच्या तुलनेत स्पोर्ट्स बाईक विकत घेण्यास अधिक पसंती देतात. कारण- या बाईकचा स्पीड साध्या बाईकच्या तुलनेत जास्त असतो. त्याशिवाय अशा बाईकचा परफॉर्मन्स आणि बाईकची डिझाइनदेखील ग्राहकांना आकर्षित करते. त्यामुळे या बाइक्स भारतात मोठ्या प्रामाणात विकत घेतल्या जातात. परंतु, ही महागडी बाईक विकत घेतल्यानंतर तिची योग्य रीतीनं काळजी न घेतल्यास तुम्हाला आर्थिक नुकसानही सोसावं लागू शकतं.
कुठल्याही बाईकसाठी त्या बाईकचे इंधन खूप महत्त्वाचं असतं. हलगर्जीपणा केल्यास तुम्हाला इंधनावर दरमहा दोन हजार रुपये खर्च करावे लागतील. पण, इंधनाचं बिल कमी करण्याचे काही मार्ग आहेत; जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गर्दीच्या ठिकाणी बाईक हळू चालवा
स्पोर्ट्स बाईकचा वेग कितीही जास्त असला तरीही गर्दीच्या ठिकाणी वेगानं बाईक चालवू नका. कारण- शहरातील रस्त्यांवर रायडिंग करणं तुमच्यासाठी व इतरांसाठीही सुरक्षित नाही. तसेच सार्वजनिक रस्त्यावर तुम्ही जितक्या वेगानं बाईक चालवाल तितक्या जलद इंधनाची कार्यक्षमता कमी होईल.
सिग्नलवर ‘इग्निशन’ बंद करणे गरजेचे
अनेक जण बऱ्याचदा बाईक सर्व ट्रॅफिक सिग्नलवरदेखील नकळत चालू स्थितीत ठेवतात. हे काही जणांकडून दिवसातून बऱ्याचदा घडते. पण, त्यांच्या या हलगर्जीपणामुळे खूप मौल्यवान इंधन वाया जाते. त्यामुळे इथून पुढे लाल सिग्नलला गाडी थांबवल्यावर ‘इग्निशन’ बंद करून, हिरव्या सिग्नलची प्रतीक्षा करा.
शक्यतो मागील ब्रेक लावणे टाळा
नवीन चालकांसाठी स्पोर्ट्स बाईक चालविण्याची सवय होण्यास थोडा वेळ लागतो. बरेच जण नकळत मागील ब्रेक लावतात; पण त्यामुळे ब्रेक पॅड्स जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे वेग जास्त वाढवावा लागतो. त्यामुळे अधिक इंधन वापरले जाते.
टायरमधील हवेच्या दाबावर नियंत्रण आवश्यक
बहुतेक लोक बाईकच्या टायरकडे दुर्लक्ष करतात; परंतु टायर हा बाईकच्या सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. कमी दाबाने टायरवर चालणारी बाईक इंधनाबाबत कमी कार्यक्षम असते. हवेच्या कमी दाबामुळे टायर्सचा कॉन्टॅक्ट पॅच वाढतो आणि त्यामुळे इंजिनाला आवश्यक गती मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. या प्रक्रियेमुळे मायलेज कमी होते. तसेच टायरमधील हवेचा दाब योग्य प्रमाणात असावा.
हेही वाचा: कारच्या AC ची कूलिंग वाढविण्यासाठी ‘ही’ एक वस्तू करील मदत; या सोप्या पद्धतीने बदला एअर फिल्टर
नियमित काळजी घ्या
बरेच जण तीन वा सहा महिन्यांतून एकदा बाईक सर्व्हिसिंग करतात. परंतु, काही गोष्टी अशा आहेत; ज्या नियमितपणे तपासायला हव्यात. बऱ्याच क्रूझर बाईक चेन गार्डसह येत नाहीत आणि त्यामुळे या बाईकचे नियमित चेन क्लिनिंग आणि ल्युबिंग करणे गरजेचे आहे.