Car Care tips: नवीन कार खरेदी करत असताना अनेक गोष्टींची माहिती घेतली जाते. म्हणजेच अगदी कारच्या फीचर्सपासून इंटेरियर, बाहेरील डिझाईन, इंजिन किती सीसीचे आहे इथपर्यंत सर्व गोष्टींची चौकशी केली जाते. त्यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गाडीचे मायलेज किती आहे हे पाहिले जाते. खरे तर, ज्या कारला मायलेज चांगले असते, ती कार खरेदी करण्याला लोक पसंती देतात. मात्र, उन्हाळ्यामध्ये गाडीचे मायलेज कमी होते, ते का कमी होते आणि ते कमी होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यातच कारचे मायलेज का कमी होते?
उन्हाळ्यामध्ये एसीशिवायचा प्रवास हा खूप अवघड होऊ शकतो. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी आणि प्रवास आरामदायी होण्यासाठी गाडीतील प्रवासी एसीचा वापर करतात. गाडीचा एसी जेवढ्या जास्त प्रमाणात वापरला जाईल, तितकेच मायलेज कमी होते. एसी सुरू असल्याने गाडीमध्ये असलेल्या इंजिन किंवा मोटरवर ताण येतो. अशामध्ये ते मेंटेन करण्यासाठी इंजिनला आधी ताकद निर्माण करावी लागते. त्यासाठी इंजिन इंधनाचा वापर करते.
वाहनाच्या कमी मायलेजला ड्रायव्हिंग स्टाईलही कारणीभूत आहे. अनेक जण बेशिस्तीने गाडी चालवतात. त्यामुळे इंजिनावर ताण येतो आणि इंधनाचा वापर वाढतो. विनाकारण गाडी सुरू ठेवणे, क्लच, गिअर व ब्रेकचा योग्य वेळी वापर न करणे या गोष्टींमुळेही गाडीचे मायलेज कमी होऊ शकते.
गाडीच्या चाकांमध्ये पुरेशी हवा नसली तरीदेखील मायलेज कमी होण्याची शक्यता असते. चाकांमध्ये हवेचा दाब कमी असतो तेव्हा गाडी चालवताना इंजिनवरील दाब वाढतो. त्यामुळे इंधनाचा जास्त वापर इंजिनाकडून केला जातो. त्यामुळे मायलेज कमी होऊ शकते. तसेच गाडीचा मेंटेनन्स वेळेत केला गेला नाही तरीदेखील मायलेजवर परिणाम होऊ शकतो.
कारचे मायलेज चांगले राहण्यासाठी काय करावे?
आता हळूहळू उन्हाळ्याला सुरुवात होईल. उन्हाळ्यात प्रवास करताना एसीचा वापर हा अत्यावश्यक असतो. उन्हाळ्यात कारचा एसी सतत वापरल्याने मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच एसीचा वापर करा म्हणजे मायलेजदेखील कमी होणार नाही.
जर का तुमची गाडी खूप काळपासून बंद असेल आणि आतून गाडी उन्हामुळे खूप तापली असेल, तर एसी सुरू करण्यापूर्वी गाडीच्या खिडक्या उघडा आणि आतील गरम हवा बाहेर जाऊ द्या. त्यासाठी तुम्ही गाडीतील पंखादेखील वापरू शकता. गरम हवा बाहेर गेल्यावर एसी सुरू करा. सुरुवातीला पूर्ण क्षमतेने एसी सुरू करू नये. गाडीला हळूहळू थंड होऊ द्या. तुमच्या गाडीला सनरूफ असेल, तर ते व्यवस्थित बंद ठेवावे.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमची गाडी शक्यतो सावली असेल त्या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न करावा. त्याशिवाय आपल्या गाडीचा मेंटेनन्स वेळोवेळी करणे आवश्यक आहे. तसेच काही थोड्या थोड्या दिवसांनी गाडीच्या चाकांमधील हवादेखील तपासून पाहावी.