लक्झरी आयुष्य जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामध्ये घर, चारचाकी गाडी अशी मोठी यादी असते. या यादीमधील सर्व इच्छा पुर्ण करण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असते. अशातच आता येणाऱ्या दसरा, दिवाळी या सणांच्या काळात अनेकजण नव्या वस्तु खरेदी करतात. त्यात बऱ्याच जणांचा या शुभ मुहूर्तावर नवीन गाडी घेण्याचा विचार सुरू असेल. तुम्ही देखील जर नवीन चारचाकी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही पेट्रोल आणि डिझेल यांपैकी कोणता पर्याय उत्तम आहे जाणून घ्या.
नवीन कार विकत घेण्याआधी आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करतो; बजेट, मायलेज, आकार, मॉडेल, त्या मॉडेलची उपलब्धता इ. याबरोबरच डिझेल कार घ्यायची की पेट्रोल कार याबाबतही आपल्या मनात शंका असते. दोन्ही गाडयांमध्ये काय फरक आहे आहे कोणती यामधल्या कोणत्या पर्यायाला तुम्ही प्राधान्य द्यायला हवे ते जाणून घ्या.
आणखी वाचा : पार्किंगमध्ये गाडी शोधण्यासाठी गूगल करणार मदत! काय आहे हे फीचर जाणून घ्या
कार विकत घेण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा
- सर्वात आधी कारचा आकार निश्चित करा तुमच्या कुटुंबानुसार तुम्ही कारच्या आकाराबाबत निर्णय घेऊ शकता. यामध्ये बजेट देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बजेटनुसार तुम्ही कारचा आकार निश्चित करा.
- त्यांनंतर पेट्रोल, डिझेल, सीएनजी या पर्यायांवर विचार करा.
- जर तुम्ही कार दररोज वापरणार नसाल आणि कारमधून एका महिन्यात केवळ ५०० किमीचा किंवा त्यापेक्षा कमी प्रवास करणार असाल, तर तुमच्यासाठी पेट्रोल कार उत्तम पर्याय ठरेल.
- जर तुम्ही महिन्याला कारमधून ८०० ते १००० किमीचा प्रवास करत असाल तर सीएनजी पर्याय उत्तम ठरेल.
- जर तुम्ही महिन्याला २००० किमीपर्यंत ड्राइव्ह करत असाल तर तुमच्यासाठी डिझेल पर्याय उत्तम ठरेल. डिझेल कारचा मेंटेनन्स कॉस्ट जास्त असतो, पण रनिंग कॉस्ट कमी असतो.
पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमतीमध्ये काय फरक असतो?
डिझेल आणि पेट्रोल कारच्या किंमतीत फरक आहे. उदाहरणार्थ, मारुती स्विफ्टच्या पेट्रोल कारची सुरुवातीची किंमत ४.९९ लाख रुपये आहे. तर स्विफ्टच्या डिझेल कारची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये आहे. ह्युंडाय ग्रँड i१० च्या पेट्रोल कारची किंमत ४.९८ लाख रुपये आहे आणि त्याच कारच्या डिझेल कारची सुरुवातीची किंमत ६.१४ लाख रुपये आहे.
आणखी वाचा : २० लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या पाच आकर्षक कार लवकरच होणार लाँच; पाहा यादी
सर्विस आणि मेंटेनन्स
डिझेल कारच्या मेंटेनन्समध्ये पेट्रोल कारपेक्षा जास्त खर्च येतो. पेट्रोल आणि डिझेल कारच्या सर्विसिंग कॉस्टमध्येही फरक आढळतो, कारण डिझेल इंजिन ऑइलसह स्पेअर्स देखील खूप महाग असतात. साधारणपणे डिझेल कारच्या सर्विसिंगचा खर्च ५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत येतो. तर पेट्रोल कारची सर्विसिंगचा खर्च ३ हजार ते १२ हजारांपर्यंत येतो. हा खर्च कार आणि त्याच्या मॉडेलवर अवलंबून असतो.