10 Seater Car in India: आजकाल, मोठी कार खरेदी करण्याचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे आणि ग्राहक एसयूव्ही आणि एमपीव्ही खरेदी करत आहेत. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह बाहेर फिरायला जायचे असेल किंवा मित्रांबरोबर फिरायला जायचे असेल आणि सर्वजण एकाच गाडीत नसतील तर मजा येत नाही. या करीता तुम्हाला मोठ्या गाडीची आवश्यकता असते. भारतीय बाजारपेठेत मोठ्या कुटुंबासाठी अनेक सात सीटर आणि आठ सीटर गाड्या उपलब्ध आहेत. सात सीटर किंवा आठ सीटर कार मोठ्या कुटुंबांसाठी लोकप्रिय पर्याय बनल्या आहेत. परंतु तुम्हाला याही पेक्षा मोठ्या गाड्यांची आवश्यकता असेल तर देशातील बाजारात दहा सीटर गाडीही उपलब्ध आहे. देशातील बाजारात दहा सीटर दाखल झाली असून या कारला ग्राहकांची पसंतीही मिळत आहे. चला तर जाणून घेऊया या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल…

देशांतर्गत कार उत्पादक फोर्स मोटर्स (Force Motors) ने काही काळापूर्वी भारतातील पहिली १० सीटर पॅसेंजर कार लाँच केली होती. याला ‘Force Citiline’ असे नाव देण्यात आले आहे, जी कंपनीच्या फोर्स ट्रॅक्स क्रूझरची अद्ययावत आवृत्ती आहे. इंडियन ऑटो मेकर ब्रँड फोर्स मोटर्स भारतात सिटीलाईन नावाने या दहा सीटर कारची विक्री करते. एमपीव्ही फोर्स सिटीलाईन आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिनने सुसज्ज असलेल्या या शक्तिशाली एमपीव्हीमध्ये दहा लोक आरामात प्रवास करू शकतात. या गाडीचं डिझाईन ट्रॅक्स क्रुझरसारखं आहे. पण यात काही फरक असून सिटीलाइन ट्रॅक्सपेक्षा वेगळी ठरते.

Force Citiline मध्ये बसण्याची व्यवस्था कशी आहे?

या गाडीमध्ये चांगली स्पेस आहे. फोर्स सिटीलाईनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त ९ लोक बसू शकतात. साधारणपणे ७ सीटर कार ३ रांगांच्या असतात. परंतु फोर्स सिटीलाईनमध्ये ४ लाईन देण्यात आल्या आहेत. यात पहिल्या रांगेत २ लोक, दुसऱ्या रांगेत ३ लोक, तिसऱ्या मध्ये २ लोक आणि चौथ्या मध्ये ३ लोक बसू शकतात. या कारच्या दुसऱ्या रांगेला ६०:४० रेशिओत फोल्ड केले जाऊ शकते, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या रांगेत जाता येईल.

(हे ही वाचा : Honda Activa ची उडाली झोप, TVS Jupiter स्कूटर नव्या अवतारात परवडणाऱ्या किमतीत देशात दाखल, किंमत फक्त… )

Force Citiline: इंजिन आणि ट्रान्समिशन

फोर्स सिटीलाइनमध्ये चार सिलिंडर, २५९६ सीसी इंजिन दिलं आहे. हे इंजिन ५-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले असून, हे ९१Bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीत कंपनीने हायड्रोलिक टेलेस्कोपिक सस्पेंशन दिले आहे. फोर्स सिटीलाइन आकाराने खूप मोठी आहे. याची ५१२०mm लांबी, १८१८mm रुंदी, २०२७mm उंची आणि ३०५०mm व्हीलबेस आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स १९१ मिमी आहे.

Force Citiline: वैशिष्ट्ये

फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास यात शक्तिशाली ड्युअल एअर कंडिशनिंग, सेंट्रल लॉकिंग पॉवर विंडो, मल्टिपल यूएसबी चार्जिंग पोर्ट्स, मागील पार्किंग सेन्सर्स, बॉटल होल्डर आणि सामानासाठी फोल्डिंग-प्रकारच्या शेवटच्या-रो सीट्स यांसारखी अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. प्रवासी आरामात वाहनात प्रवेश करू शकतात आणि बाहेर पडू शकतात.

Force Citiline: किंमत

फोर्स सिटीलाइनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात या १० सीटरची सुरुवातीची किंमत १५.९३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.