पोर्तुगालच्या अझोरेस बेटांच्या किनार्याजवळ गेल्या आठवड्यात ४ हजारांपेक्षा जास्त लक्झरी कार घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग लागली होती. या आगीत रसेल ग्रुपच्या अंदाजानुसार सुमारे ४०१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीच्या कारचे नुकसान झालं आहे. आगीमुळे जहाजावरील जवळपास सर्व वाहनांचं नुकसान झाल्याचा सांगण्यात येत आहे. पोर्शे, ऑडी आणि बेंटले आणि लॅम्बोर्गिनी या फोक्सवॅगन ग्रुपच्या जवळपास ४ हजार कार या जहाजात होत्या. वाहनांचे नुकसान झाल्यामुळे कंपनीला अंदाजे १५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झालं आहे. तर, इतर ऑटो कंपन्यांनी सुमारे २४६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची वाहने गमावली आहेत. जहाजाला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही. फेलिसिटी एस हे जहाज दाजे तीन फुटबॉल मैदानाएवढं आहे. जर्मनीच्या पोर्ट ऑफ एम्डेन येथून रोड आयलंडमधील डेव्हिसव्हिल येथील बंदरावर जात असताना गेल्या १६ फेब्रुवारी रोजी आग लागली होती. २१ फेब्रुवारीला आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं. जहाजावरील इलेक्ट्रिक वाहनांच्या लिथियम-आयन बॅटरीचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जहाजाला आग लागली त्याच दिवशी जहाजावरील २२ क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आले. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. फयालच्या अझोरियन बेटावरील सर्वात जवळ असलेल्या बंदराचे कॅप्टन जू मेंडेस कॅबेकास यांनी लुसा वृत्तसंस्थेला सांगितले की, जहाजावर फारच कमी ज्वलनशील पदार्थ शिल्लक होते, त्यामुळे आगीची तीव्रता कमी झाली आणि नियंत्रणात आणली गेली.
Video: ऑटोपायलट मोडमध्ये टेस्ला गाडीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
आता हे जहाज युरोपमधील बहामा येथे नेलं जाईल, असं सांगण्यात येत आहे. वाहनांचे नुकसान आणि स्थिती देखील तेव्हाच समजेल जेव्हा तंत्रज्ञ वाहने उघडून परिस्थितीचे विश्लेषण करू शकतील.