एप्रिल २०२२ पासून तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावासाठी १४ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. नव्या प्रस्तावानुसार १००० सीसी खासगी कार असलेल्या गाडीचा थर्डी पार्टी इन्शुरन्स नव्या प्रस्तावानुसार २,०९४ रुपये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी २०१९-२० मध्ये हा इन्शुरन्स २०७२ रुपये होता. खासगी कार १००० सीसी ते १५०० सीसी दरम्यान असेल तर नव्या प्रस्तावानुसार इन्शुरन्स ३४१६ रुपये असेल. आता इन्शुरन्स ३,२२१ रुपये आहे. तर १५०० सीसी पेक्षा जास्त असलेल्या कारचा इन्शुरन्स ७,८९७ रुपये होईल. सध्या ७८९० रुपये इतका आहे. दुसरीकडे दुचाकी १५० सीसी ते ३५० सीसी दरम्यान असतील, तर थर्ड पार्टी इन्शुरन्स १,३६६ रुपयांपासून सुरु होईल. तर दुचाकी ३५० सीसीच्या वर असेल तर कार इन्शुरन्स २,८०४ रुपये असेल. करोना महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर सुधारित थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम १ एप्रिलपासून लागू होईल असं सांगण्यात येत आहे.
विमा नियामकाशी सल्लामसलत करून रस्ते वाहतूक मंत्रालय थर्ड पार्टी दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी थर्ड पार्टी दर विमा नियामक आयआरडीएआयद्वारे अधिसूचित केले जात होते. दुसरीकडे, खासगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर गाड्यांसाठी इन्शुरन्सवर १५ टक्के सूट दिली जाणार आहे. हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार ७.५ टक्के सूट देण्याची तयारी करत आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. या विम्याअंतर्गत थर्ड पार्टीला दायित्व कवच मिळते. परिणामी, जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ता अपघात होतो, तेव्हा त्यात इतर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. याचा संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलते. म्हणजेच थर्ड पार्टी इन्शुरन्सचा थेट फायदा कोणत्याही अपघातात नुकसान झालेल्या तिसऱ्या व्यक्तीला मिळतो. म्हणूनच याला थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणतात. कार, बाईक किंवा इतर वाहनाचा अपघात झाला आणि त्यात कोणाचे शारीरिक किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर वाहन मालकाला त्याच्या नुकसानीची भरपाई करावी लागते. विमा कंपनी त्याच्या पेमेंटसाठी देखील जबाबदार आहे. अनेक प्रकारच्या भरपाईचा यात समावेश आहे.