Top 3 Best-Selling Maruti Cars: भारतामध्ये गेल्या काही वर्षांत कार विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेक लोक कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात आणि यात मारुती सुझुकीच्या कार कधीच मागे पडल्या नाहीत. सर्वांनाच माहीत आहे की, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून दरवर्षी सर्वाधिक गाड्यांची विक्री करते. परवडणारी किंमत, मायलेज, फीचर्स, लुक डिझाईन यामुळे मारुती सुझुकीच्या कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते.
नेहमीप्रमाणे, मे २०२४ मध्ये देखील मारुती सुझुकी ही सर्वात जास्त कार विकणारी कंपनी ठरली आहे. इतकेच नाही तर, मारुती सुझुकीच्या सात मॉडेलचा मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारच्या यादीत समावेश आहे, तर टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एक मॉडेलचा समावेश आहे. आज आपण मे २०२४ मध्ये मारुती सुझुकीच्या टॉप ३ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार कोणत्या आहेत, जाणून घेऊया… कंपनीला उत्कृष्ट बुकिंग मिळत आहे.
(हे ही वाचा : बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी ग्राहकांची शोरुम्सवर गर्दी, ३० दिवसात विकल्या ‘इतक्या’ स्कूटी )
मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 3 कार
१. मारुती सुझुकी स्विफ्ट
मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट ही कंपनीची मे २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. एवढेच नाही तर एकूणच सर्वाधिक विक्री होणारी ही कार होती. एकूण १९,३९३ युनिट्सची विक्री झाली आहे तर मे २०२३ मध्ये १७,३४६ युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच विक्रीत वार्षिक १२ टक्के वाढ झाली आहे. स्विफ्टला अलीकडेच एक अपडेट प्राप्त झाले आहे आणि ते आता नवीन १.२-लिटर तीन-सिलेंडर इंजिनसह आले आहे, जे ८०bhp जनरेट करते.
२. मारुती सुझुकी डिझायर
मारुती सुझुकी डिझायर कारची भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. गेल्या महिन्यात मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते. मारुतीने १६,०६१ युनिट्सची विक्री केली आहे तर मे २०२३ मध्ये ११,३१५ युनिट्सची विक्री झाली होती. त्यानुसार, त्याच्या विक्रीत वार्षिक ४२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. Dezire १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे, जे ८९bhp पॉवर निर्माण करते. यामध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यावर हे इंजिन ७६bhp देते.
३. मारुती सुझुकी वॅगन आर
तिसऱ्या स्थानावर मारुती सुझुकी वॅगन आर आहे, ज्याने १४,४९२ युनिट्स विकल्या आहेत. तर मे २०२३ मध्ये १६,२५८ युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच त्याच्या विक्रीत ११ टक्क्यांची वार्षिक घट नोंदवण्यात आली आहे. वॅगन आर ६६bhp १.०-लीटर पेट्रोल इंजिन आणि ८९bhp १.२-लीटर पेट्रोल इंजिन पर्यायांसह येतो. यामध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये ५-स्पीड मॅन्युअल आणि AMT समाविष्ट आहे.