भारतीय मोटरसायकल कंपन्यांचा भारतातच नव्हे तर जगभरात दबदबा आहे. अनेक कंपन्या भारतातून जगात मोटारसायकल निर्यात करतात. त्यामुळे भारतीय उत्पादकांसाठी देशाबाहेरही मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. जर आपण मोटारसायकलच्या निर्यातीबद्दल बोललो तर, गेल्या महिन्यात Hero MotoCorp ने मोटारसायकल निर्यातीत ७४.५२ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात १२ हजार ६५८ मोटारसायकलींची निर्यात केली. जानेवारी २०२३ मध्ये कंपनीने केवळ ७ हजार २५३ युनिट्सची निर्यात केली होती.
हिरोच्या निर्यात झालेल्या मोटारसायकलींमध्ये हिरो एचएफ डिलक्सला सर्वाधिक मागणी दिसून आली. त्याची मागणी जानेवारी २०२३ मध्ये विकल्या गेलेल्या २ हजार ४४८ युनिट्सवरून जानेवारी २०२४ मध्ये जवळजवळ ९० टक्क्यांनी वाढून ४ हजार ६३८ युनिट्सवर पोहोचली. Hero HF Deluxe ही सध्या कंपनीची सर्वाधिक निर्यात होणारी मोटरसायकल आहे. निर्यातीत या बाईकचा वाटा ३६.६४ टक्के आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये हिरो हंकची निर्यात ११६.१३ टक्क्यांनी वाढून ३ हजार ५५१ युनिट्सवर पोहोचली. त्याच वेळी, स्प्लेंडरची निर्यात १३.६४ टक्क्यांनी घसरून १ हजार ६७२ युनिट्सवर आली. हिरो ग्लॅमरची विक्री १४०.१८ टक्क्यांनी वाढून १,६१४ युनिट झाली. तर XPulse 200 ची विक्री ५५.७२ टक्क्यांनी वाढून ७३५ युनिट झाली. जानेवारी २०२४ च्या निर्यात यादीमध्ये Maestro 260 युनिट्स, Pleasure ९६ युनिट्स, Passion ९० युनिट्स आणि Karizma २ युनिट्सचा समावेश आहे.
हिरोने Maverick 440 केले लाँच
Hero MotoCorp ने नुकतीच आपली सर्वात शक्तिशाली बाईक Maverick 440 लाँच केली आहे. ही बाईक हार्ले डेव्हिडसन X440 या बाईकवर आधारित आहे. हार्लेवर आधारीत असली, तरी या बाईकचं इंजिन हे थोडंफार बदलण्यात आलं आहे. या इंजिनची क्षमता ४४०cc आहे. हे सिंगल-सिलेंडर इंजिन २७hp आउटपुट देतं. याचा टॉर्क ३६Nm आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत १.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Hero MotoCorp ने १५ एप्रिल २०२४ पासून या बाईकची डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली आहे.