देशात गेल्या काही दिवसात वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे गाडी बुक केल्यानंतरही महिनोंमहिने वाट पाहावी लागत आहेत. त्यात आता वाहनांच्या किंमतही वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्पने ४ जानेवारी २०२२ पासून त्यांच्या सर्व मॉडेल्सच्या किमती दोन हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चाची तूट भरून काढण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. हिरो मोटोकॉर्पने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी ४ जानेवारी २०२२ पासून आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या एक्स-शोरूम किमती वाढवणार आहे.
कच्च्या मालाच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीचा परिणाम अंशतः भरून काढण्यासाठी किमतीत सुधारणा करणे आवश्यक झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, “दोन हजार रुपयांपर्यंत किंमत वाढेल आणि वास्तविक वाढीचे प्रमाण मॉडेल आणि बाजारावर अवलंबून असेल.” त्याचप्रमाणे, फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाने घोषणा केली की, वाढता कच्चा माल आणि परिचालन खर्चामुळे पोलो, व्हेंटो आणि ताइगुनच्या किमती १ जानेवारी २०२२ पासून वाढणार आहेत.
Apple Days सेलमध्ये आयफोन १३ मिळतोय ६१,९०० रुपयात; मॅकबूक आणि इतर फोनवर १० हजारापर्यंतची कॅशबॅक ऑफर
कारच्या मॉडेल आणि व्हेरियंटनुसार २ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान दरवाढ होईल. पोलाद, अॅल्युमिनियम, तांबे आणि मौल्यवान धातू यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत गेल्या एका वर्षात सातत्याने वाढ होत असल्याने ऑटोमोटिव्ह कंपन्यांना मॉडेल्सच्या किमती वाढवण्यास भाग पाडले आहे. मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा सारख्या अनेक कार उत्पादकांनी पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.