Honda Electric Two Wheeler: Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ने बुधवारी जाहीर केले की ते, FY2024 मध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह दोन भिन्न इलेक्ट्रिक दुचाकी भारतात लाँच करणार आहेत. जपानी टू-व्हीलर दिग्गज कंपनीने असेही म्हटले आहे की, ते भारतीय बाजारपेठेत मध्यम श्रेणीतील इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करणार आहेत. तथापि, कंपनीने हे उघड केले नाही की, त्यांची आगामी इलेक्ट्रिक वाहने स्कूटर असतील की मोटरसायकल.
आगामी दोन इलेक्ट्रिक दुचाकी कोणत्या असतील हे देखील Honda ने उघड केलेले नाही. त्यापैकी एक अत्यंत लोकप्रिय Activa श्रेणीवर आधारित सर्व-इलेक्ट्रिक स्कूटर असू शकते. तर दुसरी Honda EM1e असू शकते, जी EICMA मध्ये प्रदर्शित केली गेली होती आणि एका चार्जवर ४० किमी पर्यंतची रेंज देते. Honda EM1e मध्ये स्वैपेबल बॅटरी आहे.
ब्रँडच्या EV धोरणाविषयी बोलताना, HMSI MD, अध्यक्ष आणि CEO अत्सुशी ओगाटा म्हणाले की, २०४० पर्यंत ब्रँडच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि फ्युएल सेल व्हेइकल्स (FCVs) चा वाटा १ टक्के असेल असे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले, “२०४० पर्यंत इलेक्ट्रिक वाहने आणि इंधन सेल वाहनांच्या युनिट विक्रीचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या Honda च्या जागतिक निर्देशानुसार, आम्ही फ्लेक्स इंधन इंजिन आणि मॉडेल सादर करून ICE इंजिनची कार्यक्षमता सुधारणे सुरू ठेवू, असे ते म्हणाले.
(हे ही वाचा : नवीन कार खरेदी करायच्या विचारात आहात? मारुतीसह ‘या’ पाच SUV होणार देशात दाखल, किंमत ७ लाख)
HMSI च्या मते, २०३० पर्यंत १ दशलक्ष वार्षिक EV उत्पादनाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे. कर्नाटकातील नरसापुरा प्लांटमध्ये भारतीय बाजारपेठेसाठी दोन इलेक्ट्रिक वाहने तयार करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, भारतीय बाजारपेठेव्यतिरिक्त, ऑटो कंपनी या EVs जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याचा विचार करत आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर लाँच करण्याव्यतिरिक्त, HMSI चे देशभरात ६,००० टचपॉइंट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे, जे EV मालकांना बॅटरी चार्ज करण्यास मदत करतील.
होंडाचा दावा आहे की, ती तिच्या इलेक्ट्रिक दुचाकींसाठी समर्पित प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. प्लॅटफॉर्म ई नावाचे, आर्किटेक्चर स्थिर आणि बदलण्यायोग्य अशा दोन्ही प्रकारच्या बॅटरी तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिक दुचाकींच्या विस्तृत श्रेणीला उर्जा देण्यास सक्षम असेल. शिवाय, ऑटोमेकरने दावा केला आहे की, नरसापुरा प्लांट हा एक समर्पित ईव्ही उत्पादन कारखाना असेल.