होंडा ही भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. नुकतीच या कंपनीने मे २०२३ या महिन्यातील विक्रीदराच्या आकड्यांची माहिती प्रसिद्ध केली. मागच्या महिन्यामध्ये होंडाने भारतीय बाजारपेठेत ४,६६० कार युनिट्सची विक्री केली. मे २०२२ मध्ये कंपनीला ८,१८८ कार युनिट्सची विक्री करण्यात यश मिळाले होते. या आकड्यांवरुन कंपनीच्या विक्रीदरात तब्बल ४३ टक्क्यांची घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. सोप्या शब्दात मे महिन्यात होंडा कार्स इंडियाच्या कार्सची कमी विक्री झाली.
Financial express ने दिलेल्या माहितीनुसार, होंडा कंपनीने मे महिन्यामध्ये ५८७ युनिट्सची निर्यात केली. मे २०२२ च्या तुलनेमध्ये हा आकडा फार खालावल्याचे लक्षात येते. मागच्या वर्षी कंपनीला १,९९७ युनिट्स निर्यात करण्यात यश मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेमध्ये कंपनीच्या निर्यातीमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. मे २०२३ मध्ये ४,६६० युनिट्सची विक्री करत होंडाने वार्षिक विक्रीदरात ४३ टक्के तर, मासिक विक्रीदरात १२.२ टक्के घट नोंदवली आहे. एप्रिल २०२३ मध्येही विक्रीचे आकडे फारसे समाधानकारक नव्हते. तेव्हा कंपनीचे ५,३१३ युनिट्स म्हणजे ५३१३ कार्सची विक्री झाली होती. विक्रीदराचे तपशीलवार आकडे पुढे देण्यात आले आहेत.
Honda Elevate SUV जागतिक पदार्पण
Honda Cars India चे मार्केटिंग आणि सेल्स मॅनेजर युइची मुरता (Yuichi Murata) यांनी विक्रीदरावर भाष्य करताना नव्या SUV च्या लॉन्चची माहिती देखील दिली. ते म्हणाले, मे २०२३ मध्ये आमच्या उत्पादनांची विक्री ही आमच्या योजनेनुसार झाली आहे. भारतात अमेझ (Amaze) आणि सिटी (City) यांना भारतीय ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सध्या नव्या Honda Elevate SUV मॉडेलच्या जागतिक प्रीमियरची तयारी करत आहोत. या कारने आमच्या नेटवर्क आणि प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे SUV मॉडेल ग्राहकांच्या पसंतीस पडेल अशी आम्हाला आशा आहे. ६ जून रोजी Honda Elevate SUV मॉडेलचे भारतात जागतिक पदार्पण करणार आहे. ही कार Elevate Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara यांना टक्कर देऊ शकते असे म्हटले जात आहे.