लांबचा प्रवास करत असताना लोक डिझेल इंजनची वाहने अधिक वापरतात. कारण ही वाहने पेट्रोल वाहनांच्या तुलनेत अधिक मायलेज देतात. मात्र अनेक कंपन्यांनी आपल्या डिझेल कार बंद करण्यास सुरूवात केली आहे. या कंपन्या आता इलेक्ट्रिक कारकडे आपले लक्ष केंद्रित करत आहेत. मारुती सुझुकी, वोक्सवॅगन, स्कोडा, निसान आणि रेनॉल्ट सारख्या कार कंपन्यांनी भारतात आधीच आपल्या डिझेल कार बंद केल्या आहेत. आता या यादीत आजून एका प्रसिद्ध कंपनीचे नाव जुळण्याची शक्यता आहे.
कार निर्माती कंपनी होंडा आपल्या डिझेल कार बंद करण्याचा विचार करत आहे. एका ऑनलाइन माध्यमाशी बोलताना होंडा कार इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले की, कंपनी आता डिझेल इंजनबाबत अधिक विचार करत नाहीये. कंपनीने युरोपीय बाजारात आपले डिझेल पावरट्रेन बंद केल्याचे ताकुया म्हणाले. त्यामुळे, येत्या काळात कंपनी डिझेल वाहनांचे उत्पादन बंद करणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या डिझेल कार होऊ शकतात बंद
सध्या भारतीय बाजारात होंडाचे चार मॉडेल डिझेल पावरट्रेनवर चालतात. त्यात जॅज प्रिमियम हॅचबॅक, डब्ल्यूआर वी सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही, अमेज कॉम्पॅक्ट सेडान आणि मिड साइज सेडान यांचा समावेश आहे. अहवालांनुसार, कंपनी जॅज, डब्ल्यूआरवी आणि सिटीचे डिझेल व्हेरिएंट बंद करू शकते. कंपनी आपले विक्री नेटवर्क अपग्रेड करण्यावर, तसेच एसयूव्ही मॉडेल लाइनअपचा विस्तार करण्यावर काम करत आहे.
भारतासाठी तिच्या आगामी नवीन एसयूव्हीने विकासाचा टप्पा पूर्ण केला आहे आणि लवकरच उत्पादन सुरू केले जाईल, अशी होंडाने पुष्टी केली आहे. ही मिड साइज एसयूव्ही असण्याची शक्यता आहे, जी ह्युंडाई क्रेटा, किया सेल्टोस, नवीन टोयोटा हायड्रर आणि मारुती ग्रॅन्ड विटाराला आव्हान देईल.