लाँग राईडसाठी क्रुजर बाईक उपयुक्त ठरते. या बाईकमध्ये सीटची उंची कमी असते. हँडल थोडे मागे झुकलेले असते. फुटपेग्स सामान्य बाईकच्या तुलनेत पुढे असतात. त्यामुळे बाईक चालवताना कंबर, पाय आणि हातांवर ताण येत नाही आणि सुखदायक प्रवास होतो. त्यामुळे अनेक रायडर क्रुजर बाईक्सना पंसती देतात. सध्या बाजारात बजाज एव्हेंजर क्रुज २२०, रॉयल इन्फिल्डची मेटिओर आणि इतर कंपन्यांच्या क्रुजर बाईक्स उपलब्ध आहेत. होंडानेही 2023 Rebel 500 ही तिची क्रुजर बाईक ग्राहकांसाठी सादर केली आहे. ही बाईक अलिकडेच लाँच झालेल्या रॉयल इन्फिल्ड मेटिओर ६५० ला आव्हान देणार आहे.
होंडाची रिबेल ५०० ही स्टँडर्ड, एबीएस आणि एबीएस एसई या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या बाईकची किंमत ५.२४ लाखांपासून सुरू होते आणि ५.६४ लाखांपर्यंत वाढते. रिबेल ५०० एबीएसची किंमत ५.४८ लाख इतकी आहे. स्टँडर्ड आणि एबीएस ट्रीम हे कॅन्डी ब्ल्यू आणि मॅट ब्लॅक मेटॅलिक रंग पर्यायांसह उपलब्ध आहे, तर उच्च स्पेसिफिकेशन असलेली एसई ट्रिम ही टायटेनियम मेटॅलिक ह्यू या रंगासह उपलब्ध करण्यात आली आहे.
(फोल्ड करून कुठेही न्या ‘ही’ ई बाईक, ५५ किमी रेंज, जाणून घ्या भन्नाट फीचर्स)
बाईकमध्ये शेंगदाण्याच्या (पीनट) आकाराचे फ्युअल टँक, मोठे टायर्स, रेक्ड फ्रंट एन्ड आणि बसण्यासाठी एक सीट देण्यात आली आहे. होंडाने ग्राहकांसाठी बाईकला कस्टमाइज करण्याचा देखील पर्याय उपलब्ध केला आहे. हेडलाईट काऊल, मीड वायझर, फोर्क कव्हर आणि नवीन सॅडलबॅग या पर्यायी अॅक्सेसरीजद्वारे बाईक क्सटमाईझ करण्याचा पर्याय आहे.
इतक्या सीसीचे मिळते इंजिन
बाईकमध्ये ४७१ सीसी, पॅरेलल ट्विन लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले आहे जे सहा स्पीड ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. फीचरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बाईकमध्ये फूल एलईडी लायटिंग, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एबीएस मॉडेलमध्ये ड्युअल चॅनेल एबीएस मिळते. परंतु, बाईकमधील हार्डवेअर कीट अपडेट केलेली नाही. बाईकमध्ये पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉक्स मिळतात. बाईकच्या पुढच्या आणि मागच्या व्हिलला डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. होंडाचे हे मॉडेल आतंरराष्ट्रीय बाजारात लोकप्रिय आहे. मात्र, ते भारतात कधी लाँच होणार याची माहिती नाही.