Global NCAP Crash Test Process: अलीकडेच मारुती सुझुकीच्या दोन कार म्हणजे मारुती सुझुकी वॅगनआर आणि अल्टो k10 चे सेफ्टी रेटिंग समोर आले होते. आंतरराष्ट्रीय एजन्सी एनसीएपीने या दोन्ही कारना क्रॅश टेस्टमध्ये १ स्टार आणि २ स्टार रेटिंग दिले. याशिवाय फोक्सवॅगन आणि स्कोडा सेडान कारची देखील क्रॅश टेस्टिंग करण्यात आली, ज्यात दोन्ही कारना ५ स्टार रेटिंग मिळाले. यावर आता कारची क्रॅश टेस्टिंग कशी केली जाते आणि कोणत्या आधारावर त्यांना ० ते ५ असे रेटिंह दिले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ग्लोबल एनसीएपी म्हणजे काय आणि कार क्रॅश टेस्टिंग कशी केली जाते जाणून घेऊ…
Global NCAP म्हणजे काय (What Is Global NCAP)
ग्लोबल एनसीएपी ( New Car Assessment Program) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेद्वारे वाहनांची सुरक्षा मानके तपासली जातात. वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेकडून प्रत्येक वाहनाची क्रॅश टेस्टच्या माध्यमातून तपासणी केली जाते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये, प्रत्येक वाहन मर्यादित वेगाने चालवत एका ठिकाणी आदळले जाते. यानंतर वाहनाच्या बाहेरील आणि आतील बाजूची तपशीलवार तपासणी केली जाते आणि त्यांना रेटिंग दिले जाते.
हेही वाचा : मारुतीच्या ‘या’ दोन लोकप्रिय कार चालवणे धोकादायक आहे का? सुरक्षेच्या बाबतीत ठरल्या अपयशी
कारची क्रॅश टेस्ट कशी केली जाते?
कारची क्रॅश टेस्ट करण्यासाठी त्यामध्ये एक डमी ठेवला जातो. या डमीला कारमध्ये माणसाप्रमाणे बसवले जाते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये कार ६४ किलोमीटर प्रति तास वेगाने चालवली जाते आणि समोर एका बॅरियरला आदळली जाते. ही धडक जणू काही समान वजनाची दोन वाहने ताशी 50 किलोमीटर वेगाने एकमेकांना धडकतात अशाप्रकारची असते.
यानंतर अनेक प्रकारे क्रॅश टेस्ट केली जाते. ज्यामध्ये फ्रंटल, साइडल, रियल आणि पोल टेस्टचा समावेश आहे. फ्रंटल टेस्टमध्ये कार समोरून आदळली जाते, साइड टेस्टमध्ये कार बाजूकडून आदळली जाते, मागील टेस्टमध्ये, कार मागून आदळली जाते आणि पोल टेस्टमध्ये कार वरून खाली पाडली जाते.
कशी मिळते NCAP रेटिंग (How is NCAP Rating Given?)
NCAP अंतर्गत, कारला ० ते ५ असे स्टार रेटिंग दिले जाते. रेटिंग जितकी जास्त तितकी कार सुरक्षित असे मानले जाते. हे रेटिंग एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन स्कोअरवर आधारित आहे. कारमध्ये ठेवलेल्या डमीच्या रीडिंगवरून हे स्कोअर मिळतात. याशिवाय कारमध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी फीचर्ससाठी वेगळे पॉइंट्सही देण्यात आले आहेत.
एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन (Adult Occupant Protection)
एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन १७ गुण ठेवण्यात आले आहेत. यात कारच्या धडकेनंतर कारमधील प्रौढ प्रवाशांना झालेल्या दुखापतीच्या आधारे गुण दिले जातात. यासाठी शरीराचे चार भागात वर्गीकरण केले जाते.
1) डोके आणि मान
2) छाती आणि गुडघा
3) फेमर आणि पेल्विस
4) पाय आणि तळवा
चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शन (Child Occupant Protection)
चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी ४९ गुण ठेवण्यात आले आहेत. यासाठी कारमध्ये १८ महिने आणि ३ वर्षांच्या मुलाचा आकाराचा एक डमी ठेवला जातो. यात कारमधील चाइल्ड रिस्ट्रेंट सिस्टीम मार्किंग, थ्री पॉइंट सीट बेल्ट आणि ISOFIX इत्यादींसाठी अतिरिक्त गुण मिळतात.