केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम म्हणजेच भारत एनसीएपी लाँच करणार आहेत. विशेष म्हणजे आता प्रथमच कारच्या क्रॅश सेफ्टी मूल्यमापनाची प्रणाली केवळ आपल्या देशातच अस्तित्वात असणार आहे आणि कंपन्यांना त्यांच्या कारची चाचणी घेण्यासाठी कोणत्याही परदेशी संस्थेकडे जावे लागणार नाही. आता देशातच नवीन गाड्यांची क्रॅश चाचणी केली जाणार आहे आणि त्यांना सुरक्षा रेटिंगही बहाल करण्यात येणार आहे. खरं तर त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार असून, कार उत्पादकांसाठीही तो एक मोठा फायदेशीर करार ठरणार आहे.
आता कार उत्पादक ऑटोमोटिव्ह उद्योग मानकांनुसार या कार्यक्रमांतर्गत वाहनांची चाचणी करू शकतील. यामुळे वाहनांचे सेफ्टी रेटिंग मिळण्यास विलंब होणार नाही आणि गाडी किती सुरक्षित आहे हे लगेचच समजणार आहे, असंही सरकारने सांगितले आहे. ते कसे काम करेल आणि त्याचे फायदे काय असतील ते जाणून घेऊयात.
कसे कार्य करणार?
- मोटारींना GNCAP प्रमाणे एडल्ट आणि चाइल्ड सुरक्षा रेटिंग दिले जाणार आहे.
- यावरून अपघाताच्या वेळी कार आणि त्यात बसलेल्या लोकांचे किती नुकसान होऊ शकते हे कळण्यास मदत होणार आहे.
- कारची क्रॅश चाचणी ५ टप्प्यांत केली जाणार आहे.
- कारच्या प्रत्येक स्तरावरील चाचणीसाठी गुण दिले जातील आणि त्याच्या आधारे त्याचे अंतिम रेटिंग निश्चित केले जाणार आहे.
कंपन्यांना काय फायदा होणार?
- त्यांच्या वाहनांची चाचणी देशातच केली जाईल, ज्यामुळे त्यांची वाहने परदेशात पाठवण्याचा खर्च वाचेल हा फायदा कंपन्यांना होणार आहे
- कार लाँच होण्याआधीच कंपन्या त्यांच्या कारची चाचणी घेण्यास सक्षम असतील, जेणेकरून ग्राहकांना त्याच्या सुरक्षिततेच्या रेटिंगबद्दल आगाऊ माहिती मिळू शकेल.
- देशात होणारी चाचणीही येथील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच होणार असून, त्याचा थेट फायदा कंपन्यांना होणार आहे.
हेही वाचाः ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लॉन्च होणार टोयोटा Rumion MPV; ‘या’ मॉडेल्सना देणार टक्कर
तुम्हाला काय मिळणार?
- तुमच्यासाठी सुरक्षित कार निवडणे सोपे जाणार आहे
- देशातच चाचणी होत असल्याने लवकरच या गाड्यांना रेटिंग मिळणार आहे.
- भारतात ही चाचणी सुरू झाल्यानंतर कंपन्या आता अधिक सुरक्षित वाहनांच्या निर्मितीवर भर देणार आहेत.