इंधनाच्या वाढलेल्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. सीएनजी हे पर्यावरणपुरक असून त्यामुळे कार चांगले मायलेजही देते. तसेच हे इंधन किफायतशीर आहे, त्यामुळे ग्राहकांची बचत होते. बाजारात अनेक सीएनजी वाहन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. टोयोटाने हायरायडर आणि ग्लान्झा हे दोन सीएनजी वाहन उपलब्ध केले असून, महत्वाचे म्हणजे जबरदस्त मायलेज देणारी आणि स्वस्त किंमतीची आल्टो के १० हिचे सीएनजी व्हेरिएंट देखील लाँच झाले आहे. मात्र तुमच्याकडील पेट्रोल कार तुम्हाला सीएनजीमध्ये बदलायची असेल तर हे शक्य आहे. यासाठी तुम्हाला वाहनामध्ये सीएनजी कीट बसवावे लागेल.
अनेक कंपन्या सरकार प्रमाणित सीएनजी कीट बनवतात. या कंपन्या तुमची कार सीएनजी कारमध्ये बदलण्यासाठी मदत करू शकतात. कार सीएनजीमध्ये बदलण्याचे अनेक फायदे आहेत. वाहनातून उत्सर्जन कमी होते आणि खर्च कमी होतो. वाहन सीएनजी आणि पेट्रोल दोन्हीवर काम करू शकते. मात्र याचे काही तोटे देखील आहेत. वाहनाचे वजन वाढते, आत जागा कमी मिळते, सीएनजी रिफ्युलिंग स्टेशन्सचा अभाव या बाबी गैरसोय निर्माण करू शकतात. दीर्घकाळ वापरानंतर इंजिनवरही प्रभाव पडू शकतो.
(फ्लिपकार्टवर ई स्कुटर्सच्या पर्यायांत वाढ, उपलब्ध केली ‘ही’ वाहने)
पेट्रोल कार सीएनजीमध्ये बदलण्यासाठी हे करा
१) संशोधन
वाहन सीएनजी इंधनाशी सुसंगत आहे की नाही हे तपासा. सामान्यत: जुन्या कार सीएनजीशी सुसंगत नसतात, मात्र नव्या कार सुसंगत असतात. याबरोबरच सरकार प्रमाणित आणि सुरक्षेच्या सर्व मापदंडांवर खरे उतरलेले सीएनजी कीट शोधा. याने वाहनाच्या विम्यावर परिणाम होईल का? याबाबत देखील माहिती शोधा.
२) परवाना
कार सीएनजी इंधनाशी सुसंगत असल्यास मालकाला वाहन सीएनजीमध्ये बदल करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. इंधनामध्ये बदल होत असल्याने नोंदणी प्रमाणपत्रात देखील सुधार करावे लागेल. यात वेळ जाऊ शकतो.
(200 किमी टॉप स्पीड, 300 किमी रेंज; पारंपरिक स्कुटर्सना मोठे आव्हान देऊ शकते ही ई स्कुटर)
३) सीएनजी कीटची खरेदी
सरकार अधिकृत डिलरकडून सीएनजी कीट खरेदी करा. सीएनजी कीट बनावट तर नाही ना, हे तपासा. तसेच, वाहन सीएनजीमध्ये बदलणे हे महागडे ठरू शकते. त्यामुळे, तयारी असल्यास हा बदल घडवा.
४) सीएनजी बसवताना ही काळजी घ्या
तज्ज्ञ व्यक्तीच्या हातून सीएनजी कीट बसवा. स्वत: असे करू नका. सीएनजी कीट लावताना सुरक्षेचा प्रश्न असतो आणि अनेक बदल करावे लागत असल्याने तज्ज्ञांची मदत घ्या.