How to drive safely at the night : “Driving is a privilege and not a right.” हे वाक्य आपल्या गाडीच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या मागे लिहिलेले असते पण हे वाक्य आपण गांभीर्याने घेतो का? रस्त्यावर सुरक्षित गाडी चालवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण तरीसुद्धा अनेक अपघाताच्या घटना दररोज समोर येतात. रात्री गाडी सुरक्षित गाडी चालवणे हे एक खूप मोठे आव्हान असते. कमी दृश्यमानतेमुळे अनेकदा अपघात होतात. रात्री सुरक्षित गाडी कशी चालवावी? यासाठी आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.
चांगले लाइट्स
तुम्ही रात्रीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुमच्या गाडीचे हेडलाइट्स आणि टेललाइट्स तपासा. तुमच्या हेडलाइट्सचा थ्रो आणि स्प्रेड तपासा. टर्न इंडिकेटर, ब्रेक लॅम्प, टेल लाईट्स, मेन हेडलाइट्स आणि फॉग लॅम्प्स नीट बघा. हे लाइट्स खराब झाले असतील तर बदला. आमच्या हेडलाइट्सवरील काच स्वच्छ आहे आणि त्यावर चिखल किंवा घाण नाही, याची खात्री करा. तसेच, हाय बीम आणि लो बीम योग्य रित्या काम करत आहेत का ते तपासा. जर तुम्हाला नियमित रात्री प्रवास करावा लागत असेल तर आठवड्यातून एकदा किंवा सुट्टीच्या दिवशी नियमितपणे तुमचे लाइट्स तपासा.
टायर तपासा
टायर्स हा गाडीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. टायर्समधील हवा तपासा. अलिकडे गाड्यांमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आहे जी टायर्समधील एअर प्रेशरविषयी माहिती सांगते. तसेच टायर्स झीज झालेले आहेत का किंवा टायर्स फाटलेला आहे का ते नियमितपणे तपासा. जर टायर्सवरील थ्रेडिंग खराब झाली असेल तर टायर बदला. नेहमी एक जास्तीचा टायर सोबत ठेवा आणि फ्लॅट टायर कसा बदलायचा ते सुद्धा शिका. अडीअडचणीच्या वेळी तुम्हाला कामी येईल. ट्यूबलेस टायर्सबाबत पंक्चर रिपेअर किट कसे वापरायचे ते सुद्धा शिका.
इंधन तपासा
प्रवास सुरू करण्यापूर्वी इंधन तपासा. अनेकदा घरातून बाहेर पडल्यानंतर कधी काय अडचण येईल सांगता येत नाही किंवा ट्रॅफिकमध्ये अडकू शकता किंवा नेहमीचा शॉर्टकट रस्त्यावर काम सुरू असेल तर लांबच्या रस्त्याने यावे लागू शकते. अशा वेळी आवश्यकतेपेक्षा थोडे जास्त इंधन गाडीमध्ये असावे.
सुरक्षित अंतर ठेवा
रात्रीच्या वेळी गाडी चालवताना नेहमीच सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवा. दिवसा आपण नेहमी सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवतो पण रात्रीच्या वेळी तुमच्या गाडीच्या पुढे असलेल्या गाडीमध्ये थोडे जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या समोरच्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्यास तुमची गाडी त्यावर आदळणार नाही. अचानक ब्रेक लावणे टाळा कारण तुमच्या मागची गाडी तुमच्या गाडीला धडकू शकते.
तंत्रज्ञानावर अवलंबून राहू नका
हल्ली गाड्यांमध्ये अनेक टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. या टेक्नॉलॉजीचा नीट वापर करा. या टेक्नॉलॉजी तुम्हाला मदत करण्यासाठी आहे तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहावे यासाठी नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी क्रूझ कंट्रोल आणि ADAS वर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. म्हणून रात्रीच्या वेळी टेक्नोलॉजी वापरताना सावधगिरी बाळगा आणि सतर्क होऊन गाडी चालवा.
वाहतूक नियमांचे पालन करा
नेहमी वाहतूक नियमांचे पालन करा. वाहतूक सिग्नल तोडू नका. घाई गडबडीत अपघात होऊ शकतो. शिस्त पाळा आणि लेन बदलण्यापूर्वी सिग्नल द्या. शहरात गाडी चालवतानाही इतर कार, पादचारी, दुचाकी स्वार आणि सायकलस्वारांकडे लक्ष ठेवा आणि सुरक्षित अंतर ठेवा. वेगाने चालवू नका. वळणांवर किंवा चौकात मध्येच तुमची गाडी थांबवू नका किंवा पार्क करू नका. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला तुमची गाडी पार्क करताना लाइट्स लावा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)