भारतात पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे तगडं मायलेज देणारी वाहनं खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर आहे. तसेच देशात सीएनजी वाहनांची विक्रीदेखील वाढली आहे. सीएनजीची किंमत ही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी आहे. तसेच वाहनं सीएनजीवर अधिक मायलेज देतात. त्यामुळे सीएनजी वाहनांचा वापर वाढला आहे. परंतु बऱ्याचदा वाहन चालवताना केलेल्या काही चुकांमुळे सीएनजी वाहनांचं मायलेज घटल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या वाहनाचं मायलेज सुधारेल.
बऱ्याचदा कंपनी जितका दावा करते तितकं मायलेज आपली कार देत नाही अशी तक्रार अनेक वाहनधारकांकडून होत असते. त्यामागे वेगवेगळी कारणं आहे. आपल्या ड्रायव्हिंगच्या चुकीच्या सवयीदेखील याला कारणीभूत आहेत.
लीकेज तपासा
सीएनजी किटमधून गॅस लीक होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. कारण बऱ्याचदा वाहनधारक त्यांच्या पेट्रोल कारमध्ये बाहेरुन (मेकॅनिक किंवा गॅरेजमधून) सीएनजी किट बसवून घेतात. अशा वाहनांमध्ये लीकेजची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या चांगल्या मेकॅनिककडून लीकेज तपासून घ्यायला हवं.
एअर फिल्टर स्वच्छ करा
सीएनजी कार चालवणाऱ्या वाहनधारकांसाठी एअर फिल्टर खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या कारमधील एअर फिल्टरमध्ये कचरा जमा झाला असेल तर त्यामुळे इंजिनवरील प्रेशर वाढतं. परिणामी इंजिन अधिक इंधनाचा वापर करू लागतं. त्यामुळे कार कमी मायलेज देते.
उत्तम दर्जाचे स्पार्क प्लग वापरा
पेट्रोल कारच्या तुलनेत सीएनजी वाहनांमधील इग्निशन टेम्परेचर जास्त असतं. त्यामुळे सीएनजी कारमध्ये मजबूत आणि उत्तम दर्जाचे स्पार्क प्लग वापरायला हवेत.
हे ही वाचा >> Royal Enfield साठी ‘ही’ बाइक ठरतेय सोन्याचं अंडं देणारी कोंबडी, बुलेट, जावा, येज्दीला धोबीपछाड
टायर प्रेशर मेन्टेन ठेवा
कारच्या टायर्समध्ये हवा कमी असेल तर इंजिनवरचा दबाव वाढतो. परिणामी इंधन अधिक खर्च होऊ लागतं. त्यामुळे कंपनीने सूचित केलंय तितकं एअर प्रेशर टायर्समध्ये असायला हवं. त्यामुळे अधून मधन टायर प्रेशर तपासत राहा.