Tips to Avoid Car Engine Overheats During Summer Hot Weather : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारच्या वेळी लोकांना बाहेर पडणं कठीण झालं आहे, अशात येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या कडक उन्हामुळे वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उष्ण हवामानामुळे वाहनांचे इंजिन गरम होऊन त्यात विविध समस्या उद्भवतात. ओव्हरहिटिंगमुळे वाहने रस्त्यातच बंद पडतात. काहीवेळा वाहनं पेट घेण्याचादेखील धोका वाढतो. अशा परिस्थितीत वाहनाच्या नियमित सर्व्हिसिंगसह प्रवासादरम्यान बिघाड होऊ नये म्हणून खालील महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी.

गाडी सावलीत पार्क करा

उन्हाळ्यात वाहन सावलीत पार्क करा, यामुळे वाहन आतून थंड राहील, शिवाय उष्णतेमुळे इंजिनचे होणारे नुकसानदेखील टाळता येईल.

कूलेंट तपासत रहा

उन्हाळ्यात गाडी सुस्थितीत ठेवण्यासाठी कूलेंट नेहमी योग्य स्थितीत ठेवा आणि नेहमी कूलेंटची एक बाटली कारमध्ये ठेवा. कूलेंट कुठे गळत तर नाही ना याची खात्री करणे देखील महत्त्वाचे आहे. कधीकधी खराब, खड्डेमय रस्त्यांवरून गाडी चालवल्याने अशा समस्या उद्भवू शकतात.

लक्षात ठेवा, जर तुम्हाला इंजिनभोवती कूलंट लिकेज होत असल्याचे आढळले तर सर्व्हिस सेंटरमध्ये जा आणि ते दुरुस्त करून घ्या, तुम्ही स्वतः ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका. कूलंट ही एकमेव गोष्ट आहे, जी इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. जर कूलंट योग्य काम असेल तर उन्हाळ्यातही तुमची कार जास्त गरम होणार नाही. चांगल्या कंपनीचे कूलंट असणे नेहमीच महत्त्वाचे असते. कमी दर्जाचे किंवा स्वस्तातील कूलेंट इंजिनचे मोठे नुकसान करू शकते.

ड्रायव्हिंग ट्रिक्स

कडक उन्हातही तुमच्या कारचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी स्मार्ट ड्रायव्हिंग ट्रिक्सचा वापर करा. कारमध्ये जास्त लोड करणं टाळा, विशेषतः लाँग ट्रिपवर जाताना कारमध्ये अतिरिक्त वजन घेऊ नका, कारण यामुळे ऑपरेटिंग हिट वाढते.
ट्रॅफिक किंवा सिग्नलवर समोरील कारपासून सुरक्षित अंतर ठेवा, ज्यामुळे वारंवार ब्रेक लावण्याची गरज भासत नाही.

जर खूप मोठ्या ट्रॅफिकमध्ये फसला असाल तर वाहन बंद केल्याने इंजिनला थोडा आराम मिळतो, ज्यामुळे ते अधिक लवकर थंड होण्यास मदत होते.

रेडिएटर स्वच्छ करा

इंजिनजवळील रेडिएटर वेळोवेळी स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने वाहन चांगले राहते. इंजिन आणि कूलंट थंड ठेवण्यासाठी योग्य रेडिएटर असणे महत्त्वाचे आहे. जर रेडिएटर स्वच्छ नसेल तर इंजिन जास्त गरम होण्याची शक्यता वाढते, म्हणून वेळोवेळी ते स्वच्छ करत रहा. बऱ्याचदा रेडिएटर खराब झाल्यामुळे इंजिन जास्त गरम होते.

लांबच्या प्रवासाला जाताना वाहन सर्व्हिसिंग करून घ्या. याशिवाय, प्रवासादरम्यान गाडी काही तासांच्या अंतराने थांबवा. इंजिन थंड होण्यासाठी १५-२० मिनिटे वाहन बंद करा. एवढेच नाही तर प्रवासादरम्यान पाण्याच्या बाटल्या आणि अतिरिक्त कूलेंट बॉक्स बरोबर ठेवा. गरज पडल्यास तुम्ही ते वापरू शकता आणि वाहन ब्रेक डाउन होण्यापासून वाचवू शकता.