पावसाळा सुरू झाला की अनेकांना बाहेर फिरण्याचे, सहलीला जाण्याचे वेध लागतात आणि मग मित्रांसह किंवा कुटुंबासह मस्त पावसाचा आनंद लुटण्यासाठी रोड ट्रिप्सच्या चर्चा सुरू होतात. मात्र, पावसाळ्यात वाहने चालवणे हे आल्हाददायी वाटत असले तरीही गाडीची योग्य तपासणी न केल्यास काही प्रमाणात धोकादायकदेखील ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चारचाकी गाड्यांमध्ये एसी सुरू असतो, अशा वेळेस बंद काचेवर धुकं जमा होणे किंवा निसरड्या रस्त्यांवर, वळणांवर गाडी स्किट होण्याचा धोका सर्वाधिक असतो. तुम्ही जर यंदा पावसात कुठे लांबच्या प्रवासाला चारचाकी गाडी घेऊन जाण्याचा विचार करत असल्यास गाडीची कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहा. तसेच तुम्ही जर कामानिमित्त दररोज वाहन चालवत असल्यास या टिप्स तुमच्यादेखील उपयोगाच्या आहेत.

हेही वाचा : Car tips : दुर्गंधी, घाण वास दूर करतील कॉफीच्या बिया; पाहा सुगंधी गाडीसाठी ‘स्वस्तात मस्त’ अशा टिप्स….

पावसाळ्यात चारचाकी चालवताना कोणती काळजी घ्यावी?

१. काचेवरील वायपर्सची तपासणी करावी.

पावसाळ्यात गाडीच्या काचेवर लावलेल्या वायपर ब्लेड्स या अतिशय महत्त्वपूर्ण असतात. रस्ता स्पष्टपणे दिसण्यासाठी पावसाच्या पाण्याचे थेंब पुसून समोरचे चालकाला पाहता येते. उन्हाळ्यात या वायपरचा फारसा उपयोग होत नसल्याने, पावसाळ्यात बाहेर पडताना हे वायपर्स काच नीट स्वच्छ करत असल्याची खात्री करा.

वायपर्स बरेच काळ तसेच राहिले असल्यास, त्याच्या ब्लेड्स खराब होऊन गाडीच्या काचेवर स्क्रॅच लागू शकतात. असे असल्यास वेळीच या वायपर ब्लेड्स बदलून घ्याव्यात.

२. हेडलाईट्सच्या काचा तपासून पाहावे

प्रचंड जोराचा पाऊस पडत असताना अनेकदा इतर गाड्यांच्या दिव्यांमुळे आपल्याला रस्त्याचा अंदाज घेता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या गाडीचे सर्व हेड्लाईटस उत्तम प्रकारे काम करत असल्याची खात्री करावी. तसेच, हेड आणि टेल लाईट्सच्या काचांमध्ये कुठेही तडा नसल्याचे तपासून घ्यावे. तडा गेलेल्या काचांमधून पावसाचे पाणी गाडीच्या हेडलाईट्स, फ्यूज आणि इतर गोष्टींना खराब करू शकते.

शक्य असल्यास तुमच्या गाडीच्या टूलकिटमध्ये एखादा सुटा फ्यूज ठेवून द्या.

३. पावसाळ्याआधी गाडीचे सर्व्हिसिंग करून घेणे

उन्हाळ्यात प्रचंड उन्हामुळे आणि तापलेल्या रस्त्यांमुळे गाडीला त्रास झालेला असतो. त्यात पावसाळा सुरू झाल्यावर, जागोजागी पाणी साचलेले असते, बराचकाळ तुमची गाडी ही पाण्यामध्ये उभी असते, त्यामुळे तुमची गाडी अचानक रस्त्यात बंद पडू शकते. प्रचंड ट्रॅफिक किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावर गाडी मध्येच बंद पडल्यावर काय करावे हे पटकन समजेनासे होते.

अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पावसाळा सुरू होण्याआधी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेणे योग्य ठरू शकते. सर्व्हिसिंगदरम्यान मेकॅनिककडून गाडीची बॅटरी आणि इतर आवश्यक गोष्टी तपासून घेण्यास विसरू नका.

४. गाडीला गंज लागण्यापासून वाचवावे

गाडी विकत घेऊन काही वर्षे झाली असल्यास, पावसाच्या पाण्यामुळे, बाष्पामुळे, दमटपणामुळे गाडीच्या लोखंडी फ्रेमला किंवा आतील गोष्टींना गंज लागण्याचा धोका असू शकतो. अशा वेळेस, तुम्ही गाडीवर अँटी-कॉरोझन ट्रीटमेंटचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही गाडीवर अँटी-रस्ट स्प्रे किंवा गाडीच्या आतील भागावर कोटिंग करू शकता.

तसेच, गाडीवर वॅक्स कोटिंग करून घ्या : ऊन आणि पावसाच्या प्रभावामुळे गाडीच्या रंगावर परिणाम होतो. गाडीचा रंग जाऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी वाहनावर वॅक्स कोटिंग करण्याचा सल्ला दिला जातो.

गाडीच्या बॅटरी टर्मिनल्सला कोट लावून घ्या : गाडीच्या बॅटरी टर्मिनल्सला गंजण्यापासून वाचवण्यासाठी त्यावर अँटी-कॉरोझन ग्रीस लावण्याने फायद्याचे ठरू शकते.

हेही वाचा : Car tips : बाईक, कारवर गंज लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी? पहा या चार सोप्या टिप्स…

५. गाडीतील काचांवरील जमणारं धुकं घालवण्यासाठी उपाय

वाहन चालवताना काचांवर असं धुकं जमा होणं धोक्याचं ठरू शकतं. बहुतांश गाड्यांमध्ये डिफॉगिंग यंत्रणा बसवलेली असू शकते. तुमच्या वाहनामध्ये ही यंत्रणा नसल्यास, ती वेळीच बसवून घेणे पावसाळ्यात फायदेशीर ठरू शकते. ज्यांच्या वाहनात ही यंत्रणा आधीपासून बसवलेली आहे त्यांनी ते यंत्र योग्यप्रकारे काम करत असल्याची खात्री करावी.

बोनस टीप –

गाडीतील दुर्गंध कसा घालवावा?

पावसाळ्यात बुटांसह गाडीमध्ये आलेले पाणी, चिखल, वातावरणातील दमट वातावरणामुळे आणि सततच्या ओलाव्यामुळे गाडीत कुबट वास राहतो. यासाठी तुम्ही दुर्गंधी घालवण्यासाठी वाहनाची नियमित स्वच्छता करू शकता. तसेच, गाडीच्या डॅशबोर्डवर कापूर, कॉफीच्या बिया अथवा गाडीत लावण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सुगंधी उत्पादनांचा वापर करू शकता.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]