HSRP Number Plate Online Registration: महाराष्ट्र परिवहन विभागाने अलीकडेच एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये एप्रिल २०१९ पूर्वी विकल्या गेलेल्या आणि तरीही वापरात असणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (High Security Registration Plate- HSRP) असणे आवश्यक आहे. ही कार्यवाही मार्च २०२५ च्या अखेरपर्यंत पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला खात्री नसेल किंवा तुमच्या वाहनासाठी ही रजिस्ट्रेशन प्लेट कशी मिळवायची याबद्दल काही शंका असेल, तर आज या लेखाद्वारे आपण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेणार आहोत. तसेच, ही वेबसाइट वापरताना जरा धीर धरा. कारण- काही पाने लोड होण्यास वेळ लागू शकतो.

अस्वीकरण : कृपया लक्षात ठेवा की, जर तुमचे वाहन महाराष्ट्र राज्यात एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असेल तरच तुम्ही HSRP साठी अर्ज करू शकता.

स्टेप १ – तुमचा आरटीओ निवडा

पहिली स्टेप म्हणजे HSRP साठी अर्ज करण्यासाठी या लिंकवर जा आणि तुमची कार जिथे नोंदणीकृत आहे, ते शहर/RTO निवडा.

स्टेप २ – बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा पर्याय सिलेक्ट करा

एकदा तुम्ही शहर निवडल्यानंतर, जर तुम्ही पहिल्यांदाच HSRP साठी अर्ज करीत असाल, तर ‘बुक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’मधील ‘बुक करा’ या पर्यायावर क्लिक करा. जर तुमची सध्याची प्लेट खराब झाली असेल, तर तुम्ही रिप्लेसमेंट प्लेटची ऑर्डरदेखील देऊ शकता.

स्टेप ३ – बुकिंग डिटेल्स जोडा

या टप्प्यावर बुकिंग सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाहनाची माहिती जशी की, नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक व नोंदणीकृत मोबाइल क्रमांक भरावा लागेल. लक्षात ठेवा की तुम्हाला चेसिस आणि इंजिन क्रमांकासाठी फक्त शेवटची ५ अक्षरेच भरावी लागतील.

स्टेप ४- संपर्क तपशील भरा

पुढे जाऊन, आता तुम्हाला तुमचा संपर्क तपशील भरावा लागेल, ज्यामध्ये वाहन मालकाचे नाव, बिलिंग पत्ता आणि ईमेल आयडी यांचा समावेश असेल.

स्टेप ५ – वन-टाइम पासवर्ड व्हेरिफिकेशन

पुढे जाण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळालेला वन-टाइम पासवर्ड एंटर करावा लागेल.

स्टेप ६ – डिलिव्हरीची पद्धत निवडा

तुमचा OTP पडताळल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिले जातील : एक तर तुमची नोंदणी प्लेट जिथे बसवली जाईल अशा केंद्राचा अपॉइंटमेंट पर्याय निवडा. दुसरे म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या पत्त्यावर HSRP डिलीव्हरी मागवू शकता. लक्षात ठेवा की, जर तुम्ही होम डिलिव्हरीचा पर्याय निवडला, तर तुम्हाला डिलिव्हरी शुल्क म्हणून १२५ रुपये (बाईकसाठी) आणि २५० रुपये (कारसाठी) द्यावे लागतील.

टीप : होम डिलिव्हरी (संदर्भासाठी)

जर तुम्हाला तुमच्या डोअरस्टेपवर HSRP डिलिव्हरी हवी असेल, तर तुम्हाला सेवा उपलब्धता तपासण्यासाठी तुमचा पिन कोड टाकावा लागेल. घरपोच सेवा उपलब्ध असल्यास, तुम्ही पुढे जाऊ शकता; अन्यथा तुम्हाला मॅन्युअली केंद्र निवडावे लागेल.

होम डिलिव्हरीनंतर गाडीवर ही प्लेट बसवून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अधिकृत फिटमेंट सेंटरशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही ही केंद्रे त्याच पोर्टलद्वारे ऑनलाइन शोधू शकता किंवा तुमच्या जवळच्या कार डीलरशिपशी संपर्क साधू शकता.

स्टेप ७ – अ‍ॅफिक्सेशन सेंटर अपॉइंटमेंट (जर होम डिलिव्हरी उपलब्ध नसेल तर)

तुमच्या परिसरातील उपलब्ध अ‍ॅफिक्सेशन सेंटर शोधण्यासाठी शहर/जिल्हा निवडा आणि पिनकोड एंटर करा. केंद्रांची यादी दिसेल, तुम्ही तुमच्या सोईनुसार एक केंद्र निवडू शकता आणि पुढे जाऊ शकता.

स्टेप ८ – अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ निवडा

केंद्र/डीलर निवडल्यानंतर, तुम्हाला उपलब्ध तारीख आणि वेळ स्लॉट दाखवले जातील. तुम्ही तुमच्या सोईनुसार निवडू शकता आणि पुढे जाऊ शकता.

स्टेप ९ – तुमचा बुकिंग सारांश तपासा

इन्स्टॉलेशनसाठी तुमचा स्लॉट निवडल्यानंतर, तुमच्या बुकिंग तपशिलांसह, तुमच्या वाहनाची माहिती प्रदर्शित केली जाईल. पुढे जाण्यापूर्वी, कृपया तुमच्या बाजूने दिलेले तपशील बरोबर आहेत ना याची खात्री करण्यासाठी पडताळणी करा.

स्टेप १० – अंतिम पेमेंट

जर सर्व काही योग्य दिसत असेल, तर तुम्ही पेमेंट करू शकता. कारसाठी, शुल्क ७४५ रुपये आहे (जीएसटी वगळून). पेमेंट UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डसह विविध पद्धतींनी करता येते. लक्षात ठेवा की दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी, HSRP चे शुल्क ४५० रुपये आहे (GST वगळून).

स्टेप ११ – पावती डाऊनलोड करा

अभिनंदन! तुम्ही तुमच्या कारसाठी HSRP यशस्वीरीत्या बुक केले आहे. कृपया पावती डाऊनलोड करा आणि अ‍ॅफिक्सेशन सेंटरला भेट देताना तुमच्या कारचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) आणि वैध ओळखपत्र आणण्याची खात्री करा.

HSRP म्हणजे काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRPs) मध्ये एक विशेष क्रमांक आणि कोड असतो. HSRPs चा वापर सरकारने एप्रिल 2019 नंतर विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी अनिवार्य केला आहे, ज्याचा उद्देश वाहनाशी संबंधित गुन्हे कमी करणे आणि रस्ता सुरक्षा वाढवणे आहे.

Story img Loader