भारतात १ एप्रिल २०२३ पासून बीएस ६ नॉर्म्सचा दुसरा टप्पा लागू केला जाणार आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या सर्व कार्समध्ये नवीन नियमांनुसार नवीन इंजिन अपडेट करू लागल्या आहेत. परंतु असे काही मॉडेल्स भारतीय बाजारात उपलब्ध आहेत, जे अपडेट केले जाणार नाहीत. उलट कंपन्या या मॉडेल्सची विक्री बंद करू शकतात. यामध्ये डिझेल कार्सची संख्या जास्त आहे. ह्युंदाई कंपनी देखील त्यांची प्रीमियम हॅचबॅक कार आय-२० लाईनअपमधील डिझेल व्हेरिएंटची विक्री बंद करणार आहे. ही कंपनीची देशातली सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे. परंतु प्रीमियम हॅचबॅक कार्सच्या सेगमेंटमध्ये मारुती बलेनोचा दबदबा आहे. तसेच या सेगमेंटमध्ये टाटा टिगॉरला देखील उत्तम पसंती मिळत आहे. मारूतीने जानेवारी महिन्यात बलेनोच्या १६ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री केली होती.
ह्युंदाई आय २० कारचं डिझेल मॉडेल बंद करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे कमी मागणी. या कारच्या पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल मॉडेलला सर्वाधिक मागणी आहे. तसेच डिझेल कार अपडेट केल्यास या कारच्या किंमतीत आणखी वाढ होईल. त्यामुळे कंपनीने हे मॉडेल बंद करून केवळ पेट्रोल आणि टर्बो पेट्रोल मॉडेल विकण्याला पसंती दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला टाटा मोटर्सने त्यांच्या अल्ट्रॉझ कारचं डिझेल व्हेरिएंट अपडेट केलं आहे.
ह्युंदाई आय-२० चे अनेक इंजिन पर्याय उपलब्ध
डिझेल इंजिन बंद केलं तरी ह्युंदाईकडे या कारचे चार इंजिन सेट व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. यामध्ये १.२ लीटर कप्पा पेट्रोल इंजिन जे ११९७ सीसी क्षमतेचं आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येतं. ही कार मॅग्ना, स्पोर्ट्ज, एस्टा आणि एस्टा (ओ) अशा चार ट्रिम्समध्ये येते. या कारचं इंजिन ८६.५ बीएचपी पॉवर जनरेट करू शकतं.
हे ही वाचा >> ‘या’ कारसमोर टाटा, ह्युंदाई, होंडाच्या सर्व गाड्या फेल, ठरली देशातली बेस्ट सेलिंग सेडान
ह्युंदाई आय-२० चे फीचर्स
नवीन आय-२० कार ६ मोनोटोन आणि २ डुअल टोन कलर ऑप्शन्समध्ये येते. यामध्ये १०.२५ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. त्यासोबत रियर व्ह्यू कॅमेरा, इंटिग्रेटेड एअर प्युरिफायर, मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, नेव्हिगेशन आणि व्हॉईस रेकग्निशन, क्रूझ कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग तसेच ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्ससारखे फीचर्स देण्यात आले आहेत.