Hyundai Creta ही सध्या भारतात सर्वाधिक विकली जाणारी मध्यम आकाराची SUV आहे. या कारची दर महिन्याला प्रचंड विक्री होते आणि दर महिन्याला ती टॉप १० कारच्या लिस्टमध्ये राहते. आता २०२४ मध्ये या कारमध्ये ग्राहकांना फेसलिफ्ट अपडेट मिळणार आहे. यामध्ये अनेक एक्सटीरियर आणि इंटीरियर अपडेट्स पाहायला मिळतील. लोक या एसयूव्हीच्या फेसलिफ्ट मॉडेलची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता या कारचे जानेवारीला अनावरण होणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी कंपनीने या कारचे बुकींग सुरु केले आहे.
उत्तम पॉवर, परफॉर्मन्स, लुक-डिझाइन आणि फीचर्ससह, नवीन क्रेटा फेसलिफ्टमध्ये अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम दिसू शकते. यात अनेक महत्वपू्र्ण बदल करण्यात आले आहेत. Hyundai Creta Facelift कार एकूण सात व्हेरियंटमध्ये सादर होणार असल्याची माहिती आहे. तर ही कार ६ मोनो टोन आणि एक ड्युअल टोन एक्स्टिरियर कलर ऑप्शनमध्ये ऑफर केली जाईल.
नवीन क्रेटा फेसलिफ्टमध्ये तीन पॉवरट्रेन पर्याय असतील, ज्यात १.५L टर्बो पेट्रोल (नवीन), १.५L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल आणि १.५L टर्बो डिझेल इंजिन समाविष्ट आहे. Verna मधून घेतलेले टर्बो पेट्रोल इंजिन १६०bhp जनरेट करते. यात चार गिअरबॉक्स पर्याय देण्यात आले आहेत. नवीन 2024 Hyundai Creta फेसलिफ्टला पूर्वीच्या तुलनेत प्रीमियम इंटीरियर मिळेल. एसयूव्हीला नवीन एलईडी हेडलॅम्प, हॉरिझन एलईडी पोझिशनिंग लॅम्प, डीआरएल आणि सुधारित नवीन ग्रिल मिळेल.
(हे ही वाचा : एलॉन मस्कच्या टेस्लाचा गेम होणार? स्मार्टफोननंतर आता Xiaomi ने आणली इलेक्ट्रिक कार, रेंज पाहून थक्क व्हाल )
वैशिष्ट्ये
ह्युंदाईनेही नवीन क्रेटाच्या सुरक्षिततेवर भर दिला आहे. यात ३६०-डिग्री सराउंड कॅमेरासह अनेक प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत. याला लेव्हल २ ADAS च्या स्वरूपात एक प्रमुख अपडेट प्राप्त झाले आहे. त्याच्या ADAS मध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, इमर्जन्सी ब्रेकिंग, टक्कर टाळणे आणि हाय बीम असिस्ट यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. SUV मध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. हे नवीन सेल्टोसमध्ये दिसण्यासारखे आहे.
‘इतक्या’ रुपयांत करा बुकींग
2024 Hyundai Creta फेसलिफ्टचे बुकिंग अधिकृतपणे देशभरात सुरू झाले आहे. या कारची बुकिंग रक्कम २५ हजार रुपये आहे. बुकिंग उघडण्यासोबतच, Hyundai ने अपडेटेड Creta चे प्रकार, वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन पर्यायांबद्दल माहिती शेअर केली आहे. Creta Facelift कार E, EX, S, S(O), SX, SX(Tech), SX(O) या एकूण सात व्हेरिअंटसाठी बुकिंग घेत आहे. ग्राहक कंपनीच्या साईटवर तसेच कंपनीच्या डीलरशिपवरही कारचे बुकिंग करू शकतात.
किंमत
सध्या कारची किंमत १०.८७ लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत १९.२० लाख रुपये आहे. या नव्या क्रेटा फेसलिफ्टच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १६ जानेवारीला ही कार लाँच होणार असल्याची माहिती आहे.