Hyundai Motor India भारतीय बाजारपेठेत दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दरवर्षी देशातील बाजारात या कंपनीच्या कारची विक्री धडाक्यात होत असते. दर महिन्याला टाॅप १० कारच्या विक्री यादीत ह्युंदाईच्या कारचाही समावेश असतो. पेट्रोल कार बरोबरच बाजारात ह्युंदाईच्या इलेक्ट्रिक कारलाही मागणी दिसून येते. त्यामुळे कंपनी आपल्या नवनव्या कार लाँच करीत असते. पण ह्युंदाईने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपली एक इलेक्ट्रिक कार बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
Hyundai Motor India ने भारतीय बाजारपेठेतील त्यांची एक इलेक्ट्रिक कार बंद केली आहे. कंपनीने ह्युंदाई कोना इलेक्ट्रिकला बाजारातून गायब केले आहे. तसेच ही इलेक्ट्रिक कार Hyundai India च्या वेबसाईटवरून देखील हटवण्यात आली आहे. Hyundai ने कोना इलेक्ट्रिकला बाजारात कधीही अपडेट केले नाही आणि Hyundai ची ती पहिली इलेक्ट्रिक कार होती, जी कंपनीने भारतीय बाजारात आणली.
क्रेटा ईव्हीमुळे कोना इलेक्ट्रिक झाली गायब
असे दिसते की, कार निर्माता क्रेटा ईव्ही बाजारात आणण्याचा विचार करत असल्याने कंपनीने कोना इलेक्ट्रिकला भारतीय बाजारातून मागे घेण्याची योजना आखली. कोना इलेक्ट्रिकच्या विक्रीत घट होत होती कारण या कारचे इंटीरियर डिझाइन कालांतराने जुने झाले होते. Hyundai कार भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकीनंतर ह्युंदाई देशांतर्गत बाजारात सर्वाधिक कार विकते. तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की Hyundai च्या लाइनअपमधील कोना कारला गेल्या महिन्यात म्हणजे मे २०२४ मध्ये कोणताही खरेदीदार सापडला नाही, हे बंद करण्यामागील मोठे कारण आहे.
(हे ही वाचा : कारचे ब्रेक लावताना क्लच का दाबू नये तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या यामागील खरं कारण)
Creta EV 2025 मध्ये येणार बाजारपेठेत
Hyundai India ने पुष्टी केली आहे की, ते जानेवारी २०२५ मध्ये त्यांचे पहिले मास मार्केट इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणार आहे. ही कार क्रेटाची इलेक्ट्रीफाईड आवृत्ती असू शकते आणि ही कार कंपनीच्या तामिळनाडू कारखान्यात तयार केली जाऊ शकते. कंपनी प्रथम Hyundai ची Creta EV लाँच करेल अशी अपेक्षा आहे, कारण या कारची ICE आवृत्ती भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय SUV पैकी एक आहे.
Creta EV रेंज
Hyundai ने अद्याप Creta EV च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण ही कार सिंगल चार्जिंगमध्ये सुमारे ४०० ते ५०० किलोमीटरची रेंज देऊ शकते. मारुती सुझुकीच्या आगामी इलेक्ट्रिक कार eVX मध्येही तुम्ही हीच श्रेणी पाहू शकता. मारुतीची इलेक्ट्रिक कार सुमारे ५५० किलोमीटरच्या रेंजसह येऊ शकते.
Creta EV ची किंमत किती आहे?
Creta EV भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करू शकते. ही कार MG ZS EV, Tata Curve, Maruti Suzuki eVX, BYD Atto 3 आणि Mahindra XUV400 ला टक्कर देऊ शकते. Hyundai च्या या EV ची किंमत २० लाख ते ३० लाख रुपये असू शकते.