Bike Care Tips: काही जण आपल्या बाईकची खूप काळजी घेतात अन् बाईकला खूप जपताना दिसतात. पण, बरेच जण असेही असतात की, जे बाईकची व्यवस्थित काळजी न घेता, ती कशीही ‘रफ’ चालवतात. पण, तुम्हाला जर तुमची बाईक दीर्घकाळ चांगली राहावी, असे वाटत असेल, तर तुम्हाला तिची योग्य आणि नियमित काळजी घ्यायला हवी. चांगली देखभाल ठेवलेली बाईक अधिक कार्यक्षम असेल आणि प्रवासात सातत्याने चांगली साथ देईल. तसेच अशी चांगल्या स्थितीत ठेवलेली बाईक चालवणे दूरच्या प्रवासासाठीदेखील अधिक सुरक्षित ठरेल. परंतु, तुम्हाला त्यासाठी बाईकच्या देखभालीच्या संदर्भातील काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
बाईक दीर्घकाळ चांगली राहण्यासाठी टिप्स (Bike Care Tips)
बाईक मॅन्युअलचे पालन करा
बाईक विकत घेताना, त्या बाईकबरोबर एक मॅन्युअल (माहिती पुस्तिका)देखील मिळते; ज्यामध्ये तुमच्या बाईकच्या प्रत्येक घटकाची, ती कशी चालवायची आणि त्याची काळजी कशी घ्यायची याची माहिती दिलेली असते. त्यासाठी तुम्ही हे मॅन्युअल एकदा नीट वाचून घ्या. मॅन्युअल तुम्हाला तुमच्या बाईकचा प्रत्येक भाग आणि त्याची देखभाल यांबाबतची माहिती देते. त्यामुळे हे मॅन्युअल वाचून, त्यातील नियमांचे पालन करा.
बाईकचा ब्रेक
बाईकचे ब्रेक फार कठीण किंवा खूप सैल नसावेत. त्यामुळे त्याकडेदेखील नियमित लक्ष द्यायला हवे.
इंजिन तेल बदला
तुमचा प्रवास इंजिन तेलावर अवलंबून असतो. तुमचे इंजिन तेल नियमितपणे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण- तेल इंजिनला थंड ठेवते. खराब वा चुकीचे तेल इंधन म्हणून वापरल्यास इंजिनाची क्षमता आणि त्याचे आयुष्य कमी होते. इंजिन तेलाची गुणवत्ता व प्रमाण यांसह, कोणत्याही संभाव्य तेलाची गळती नेहमी तपासून घ्या.
बाईकच्या बॅटरीचे नुकसान टाळा
बाईकचे इलेक्ट्रिक घटक योग्यरीत्या कार्यक्षम राहण्यासाठी बॅटरी चांगल्या स्थितीत असणे खूप महत्त्वाचे आहे. जर बाईकची बॅटरी चांगली असेल, तर तुमच्या बाईकचे हेडलाईट, हॉर्न व इंडिकेटर्स नीट काम करतील. तसेच बॅटरीच्या सर्व वायर्स ठीक असणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. कारण- त्याच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होईल आणि कोणतीही दुर्घटना टाळणे शक्य होईल.
टायर्सची काळजी
बाईकच्या टायर्सची तपासणी करा. नाही तर हळूहळू टायरमधील हवा कमी होईल. टायर चांगल्या स्थितीत असायला हवेत. तसेच टायरमधील हवेचा दाब योग्य पातळीवर ठेवा. जेव्हा बाईकचे टायर हवेच्या कमी दाबावर चालतात तेव्हा इंधनाचीही बचत होते. त्याचप्रमाणे जास्त हवा भरलेल्या टायर्सनी बाईक चालवल्याने टायर फुटण्याचा धोका वाढतो. तुम्ही ते कोणत्याही गॅस स्टेशनवर तपासू शकता किंवा आठवड्यातून एकदा गेजने टायरमधील हवेचा दाब स्वतः तपासून पाहू शकता.
हेही वाचा: तुमची जुनी कार नवी दिसण्यासाठी ‘या’ सहा टिप्स करतील मदत; कार दिसेल नेहमी चकाचक
एअर फिल्टर्स तपासा
आपल्याकडे रस्त्यांवर प्रचंड धूळ असते आणि म्हणूनच तुमच्या बाईकचे एअर फिल्टरमध्ये काही अडकले नाही ना हे सतत तपासत राहा. तुम्हाला बाईक चांगल्या कार्यक्षमतेने धावायला हवी असल्यास एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.