सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत राहतात. अनेकदा व्यवसाय किंवा जीवनाबद्दल प्रेरणात्मक तर कौतुकास्पद गोष्टी पोस्टमध्ये शेअर करत असतात. आता देशातील आघाडीचे उद्योगपती तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट २०२४ मध्ये सहभागी झाले आणि त्यांनी कंपनीच्या भविष्यातील योजनांसह काही जुन्या गोष्टी शेअर केल्या आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या प्रसिद्ध एसयूव्हीशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. महिंद्राची एसयूव्ही कार यशस्वी झाली नसती तर मला कामावरून काढून टाकलं असतं, असं त्यांनी सांगितलं आहे.
तुम्हाला कधी असे वाटले आहे की तुम्ही हार मानली पाहिजे, किंवा तुम्हाला कधी वाटले आहे की एखादे उत्पादन किंवा वस्तू जसे पाहिजे तसे काम करत नाही? असे प्रश्न महिंद्रांना विचारण्यात आले. या प्रश्नाच्या उत्तरात आनंद महिंद्रा यांनी कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV महिंद्रा स्कॉर्पिओशी संबंधित एक अतिशय मनोरंजक किस्सा शेअर केला. आनंद महिंद्रा म्हणाले की, “हे जरी माझ्या मनात आले नव्हते, परंतु माझ्या कंपनीच्या काही संचालकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला होता.”
(हे ही वाचा : सुरक्षेच्या बाबतीत ‘या’ कारला तोड नाय! ६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्सवाली देशात येतेय SUV, बुकींगही सुरु )
आनंद सांगतात की, “बर्याच वर्षांपूर्वी, जेव्हा महिंद्रा स्कॉर्पिओ बाजारात यशस्वी झाली होती, त्यावेळी आयसीआयसीआय बँकेचे प्रमुख के.व्ही. कामत माझ्यासोबत फ्लाइटमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी कामत यांनी आनंद महिंद्रांना सांगितले की, सर्व बोर्ड सदस्य आणि अगदी केशव महिंद्रा यांनी देखील नवीन वाहन स्कॉर्पिओवर मोठी पैज घेतली आहे.
“ते फक्त एका उत्पादनावर इतके पैसे गुंतवत आहेत. कंपनीने याआधी कोणत्याही उत्पादनावर इतका पैसा खर्च केला नाही. जर हे उत्पादन यशस्वी झाले नसते तर त्यांनी तुम्हाला काढून टाकले असते.” यानंतर आनंद महिंद्रा कामत यांना म्हणाले, “देवाचे खूप आभार मला हे माहित नव्हते, अन्यथा मी खरंच खूप घाबरलो असतो.”