भारतात वाहनांची सुरक्षा हेच सध्याचं सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई आणि किया कारला मोठी मागणी आहे. दक्षिण कोरियाच्या दोन्ही ऑटो कंपन्यांनी देशातील कार बाजारात आपली चांगली पकड बनवली आहे. ह्युंदाई क्रेटा आणि किया सेलटॉस मॉडेल्स भारतात कमी कालावधीत खूप लोकप्रिय झाली आहेत. मात्र, नुकत्याच आलेल्या एका अहवालात दोन्ही कंपन्यांच्या कारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
इन्शुरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी (IIIHS) या अहवालानुसार, ह्युंदाई आणि कियाच्या कार चोरी करण्यासाठी सर्वात सोप्या असल्याचे समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये चोरांनी किया आणि ह्युंदाईच्या गाड्या कशा चोरल्या हे देखील दिसले आहे. HT Auto च्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओंमध्ये चोर ह्युंदाई आणि किया वाहनांचे इग्निशन कव्हर काढताना दिसत आहेत, त्यानंतर कार सुरू करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर किंवा USB केबल वापरताना दिसत आहेत. जाणून घेऊया या कारचे चोरीचे कारण नेमके काय आहे.
आणखी वाचा : टाटाच्या ‘या’ ईव्हीमध्ये मिळणार हे भन्नाट फिचर, ब्रेक मारताच चार्ज होईल कार, जाणून घ्या..
ह्युंदाई आणि किया कारच्या चोरीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे कारमध्ये इमोबिलायझर नसणे हा आहे. IIIHS च्या संशोधनानुसार, २०१५ ते २०१९ दरम्यान बनवलेल्या या दोन्हीं कारच्या कार मॉडेल्समध्ये इलेक्ट्रॉनिक इमोबिलायझर नाही, असे उघड झाले आहे.
२०१५ मध्ये, इतर कार कंपन्यांच्या ९६ टक्के कारमध्ये इमोबिलायझर मानक होते. तर ह्युंदाई आणि कियाच्या बाबतीत फक्त २६ टक्के गाड्यांना इमोबिलायझर देण्यात आले होते. मात्र, दोन्ही कार कंपन्यांनी त्यांच्या कारमध्ये इमोबिलायझर न वापरण्याचे कारण दिलेले नाही.
२०२२ मॉडेल सादर केल्यानंतर, कियाने आपल्या वाहनांमध्ये इमोबिलायझर्स प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ह्युंदाईचे म्हणणे आहे की, १ नोव्हेंबर २०२१ नंतर उत्पादित सर्व वाहनांनी मानक म्हणून इमोबिलायझर वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यातील सत्यता काय हे अजुन उघड झालेले नाही.