आपल्या देशात वाहतुकीशी संबंधित वेगवेगळे नियम आहेत आणि हे नियम मोडल्यास नागरिकांना दंडही भरावा लागतो. पण तरीही भारतातील लोक या नियमांच्या बाबतीत उदासीन आहेत. ते हे नियम पाळतातच असे नाही. दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे, गाडी चालवताना लायसन्स आपल्याबरोबर बाळगावे, फोनवर बोलू नये, सीट बेल्ट लावावे, हे काही साधारण नियम आहेत.
जगातील प्रत्येक देशात वाहतुकीशी संबंधित काही नियम असतात. मात्र, त्यांचे स्वरूप काही प्रमाणात भिन्न असू शकते. या नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांना दंडही भरावा लागतो. वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते. म्हणूनच या नियमाचे पालन करणे अनेक देशांमध्ये अनिवार्य आहे. मात्र असा एक देश आहे जिथे वाहन चालवताना सीट बेल्ट वापर करणे हा एक गुन्हा मानला जातो आणि सीट बेल्टचा वापर केल्यास येथे दंड भरावा लागतो.
जर एखादी व्यक्ती सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडली गेली तर त्याच्यावर दंड आकारला जातो. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये असाच नियम आहे, पण जगात असा एक देश आहे जिथे सीटबेल्ट घातल्यावर तुम्हाला दंड भरावा लागेल. या देशात गाडी चालवताना सीट बेल्ट लावायला सक्त मनाई आहे. युरोपमधील एस्टोनिया या देशामध्ये असा नियम आहे.
एस्टोनियामध्ये विशिष्ट रस्त्यांवर वाहन चालवताना सीट बेल्ट घालण्यास मनाई केली जाते. याचे कारणही अतिशय वेगळे आहे. या रस्त्यांवर बऱ्याचदा बर्फ पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बर्फ पडल्यास गाडीतील लोकांना ताबडतोब वाहनातून बाहेर पडता यावे म्हणून हा नियम करण्यात आला आहे. सीट बेल्ट घातल्याने वाहनातून बाहेर पडण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे चालकांना सीटबेल्ट घालण्याची परवानगी नाही. हा रस्ता बाल्टिक समुद्राच्या पलीकडे हिमिया बेटाच्या जवळ आहे.
या नियमाशिवाय एस्टोनियाचे इतरही अनेक नियम इतर देशांपेक्षा वेगळे आहेत. या देशात सूर्यास्तानंतर बर्फाच्छादित रस्त्यावर वाहन चालवण्यास मनाई आहे. तसेच अडीच टनापेक्षा जास्त वजनाची वाहने या रस्त्यांवर चालवता येत नाही. येथे गाडी चालवण्याचा वेग ताशी २५ ते ४० किमी आहे.