बापू बैलकर

दणकट, सुरक्षित आणि ऑफ-रोडिंग करता येत असल्याने भारतात तयार होणाऱ्या एसयूव्ही म्हणजे स्पाेर्ट युटिलिटी व्हेईकल या वाहनांना आता परदेशातही विशेषत: त्यांच्या लष्करी आणि निमलष्करी दलांसाठी मागणी आहे. आशियाई, आफ्रिकन आणि अगदी युरोपियन देशांकडून त्यांच्या सुरक्षा दलांसाठी भारतातून या मोटारी खरेदी केल्या जात आहेत. यात टाटाची हेक्सा, सफारी, महिंद्राची एन्फोर्सर, एक्सयूव्ही ५०० आणि स्काॅर्पिओ या एसयूव्हींचा समावेश आहे.

टाटा हेक्सा

टाटा मोटर्सच्या हेक्सा या एसयूव्हीसाठी बांगलादेशातील लष्कराकडून २०० मोटारींची मागणी आली असून ते त्यांच्या देशाच्या सैन्यदलाचे अधिकृत वाहन होणार आहे. यासाठी या एसयूव्हीची कंपनीकडून अनेक दिवस विविध पातळींवर चाचणी करण्यात आल्यानंतर हा करार करण्यात आला आहे. सातआसनी असलेल्या या एसयूव्हीमध्ये २.२ लिटर डिझेल इंजन असून फोर व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे. हे इंजिन १५६ ची पाॅवर आणि ४०० न्यूटन मीटर टॉर्क देते.

महिंद्रा एन्फोर्सर

फिलिपिन्समध्ये त्या देशातील पोलीस दलासाठी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे एन्फोर्सर हे वाहन वापरले जात आहे. यासाठी २०१५ मध्ये १४७० मोटारींची खरेदी झाली. एन्फोर्सर हे महिंद्राच्या बोलोरा या पिकअप ट्रकची सुधारित आवृत्ती आहे.

विश्लेषण : सॅमसंग, सोनी, ॲपल सारख्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंमती का वाढवत आहेत? जाणून घ्या

महिंद्रा एक्सयूव्ही ५००

दक्षिण आफ्रिकेत महिंद्रा आणि महिंद्राच्या वाहनांना विशेष मागणी आहे. दणकटपणा आणि विश्वासार्हतेसाठी त्या देशात महिंद्रा आणि महिंद्राची वाहने ओळखली जातात. त्यांच्या पोलीस दलासाठी महिंद्राची एक्सयूव्ही ५०० ची निवड झाली आहे. ही सातआसनी एसयूव्ही असून २.० लिटर पेट्रोल इंजिन आणि २.२ लिटर टर्बो डिझेल इंजिन आहे.

टाटा सफारी स्टॉर्म

अल्जीरिया या देशात टाटा मोटर्सच्या एसयूव्ही कारला मागणी असून तेथे मोठ्या प्रमाणात भारतातून मोटारी आयात करतात. टाटा सफारी स्टॉर्म ही त्यांच्या पोलीस दलाची मोटार आहे. सफारी ही आरामदायी, ऑफ-रोडिंग क्षमता आणि सुरक्षित कार म्हणून प्रसिद्ध असल्याने ही एसयूव्ही त्यांच्या सुरक्षा दलात वापरली जात आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ

मालदिवची राजधानी माले येथील पोलीस दलात महिंद्रा आणि महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारचा वापर केला जातो. फिलिपिन्सच्या सुरक्षा दलासाठीही २०१६ मध्ये ३९८ मोटारी खरेदी करण्यात आल्या आहेत. तर इटालियन आल्प्समध्ये सुरक्षा दलामध्ये स्कॉर्पिओ मोटारीचा वापर करण्यात येत आहे. श्रीलंकेच्या पोलीस दलातही याच मोटारीचा वापर होतो. त्यांनी ४८५ मोटारी खरेदी केल्या आहेत. शक्तिशाली इंजिन, आरामदायी दालन, कोणत्याही रस्त्यावर सहज हाताळता येते.

विश्लेषण : ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा इतिहास जाणून घ्या

महिंद्राची स्कॉर्पिओ ही एसयूव्ही अनेक देशांतील सुरक्षा दलांसाठी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असून तिला मोठी मागणी आहे. कंपनीने नुकतीच स्कॉर्पिओ क्लासिक ही एसयूव्ही बाजारात आणली आहे.

एसयूव्हीच का?

डिझाइन हे एसयूव्ही लोकप्रिय होण्याचे एक प्राथमिक कारण आहे. मोठे टायर, आकर्षक फ्रंट ग्रिल, उंची आणि मोठा व्हीलबेस या सर्व बाबी एसयूव्हीला अधिक आकर्षक बनवतात. क्षमता हा आणखी मोठा गुण ठरतो. मोठ्या क्षमतेचे इंजिन व इतर चलस्वरूपाचे भाग त्यात बसविणे उत्पादकांना सोपे जाते. प्रशस्तपणा हा सर्वात मोठा फायदा असतो. उच्च-कार्यक्षमता, सस्पेन्शन सिस्टीमसह मोठी चाके आणि चाकांच्या कमानी या वैशिष्ट्यांमुळे एसयूव्ही खडबडीत रस्त्यांवरूनदेखील जणू काही तरंगत जाते. तीव्र वळणांवर ती रस्ता सोडत नाही आणि त्यामुळे तिच्यातील प्रत्येक सफर ही सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण ठरते. तसेच भारतीय एसयूव्ही या अजूनही इतर देशांच्या तुलनेत वाजवी दरात उपलब्ध असतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे परदेशातील सुरक्षा दलांकडून त्यांच्यासाठी मागणी वाढली आहे.