iVOOMi S1 variants launched : स्वस्तात मस्त आणि चांगले मायलेज मिळत असल्याने इलेक्ट्रिक स्कुटर्सची मागणी वाढली आहे. देशात ई स्कुटर बाजारपेठेत ओलाचा दबदबा आहे. बजाज, अथर या वाहन कंपन्यांच्या स्कुटर्स देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. नवीन कंपन्या देखील आपल्या स्कुटर्स उपलब्ध करत असून प्रस्थापित कंपन्यांना तगडे आव्हान देत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी iVOOMi एनर्जीने आपल्या S1 स्कुटरचे तीन व्हेरिएंट लाँच केले आहेत. यामध्ये S1 80, S1 200, and S1 240 या तीन स्कुटर्सचा समावेश आहे. स्कुटर्सची किंमत ६९ हजार ९९९ रुपयांपासून १.२१ लाखांपर्यंत (एक्सशोरूम) आहे.
इतकी मिळते रेंज
तिन्ही व्हेरिएंट पिकॉक ब्ल्यू, नाइट मरून आणि डस्की ब्लॅक या रंग पर्यायांसह सादर करण्यात आले आहेत. एस वन २४० स्कुटरची रेंज २४० किमी असून अतिरिक्त टॉर्कसाठी तिच्यात २.५ किलोवॉट मोटरसह ४.२ किलोवॉट हवरचे ट्विन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. तर एस१ ८० स्कुटरमध्ये १.५ किलोवॉट हवरचे बॅटरी पॅक देण्यात आले असून, ही स्कुटर ८० किमीची रेंज देते.
एस१ ८० मध्ये २.५ किलोवॉटची हब माउंटेड मोटर देण्यात आली आहे, जी ५५ किमीची सर्वोच्च स्पीड देते, असा दावा केला जात आहे. एस १ सिरीजच्या तिन्ही स्कुटर्समध्ये इको, रायडर आणि स्पोर्ट असे तीन मोड्स मिळतात.
नवीन आयव्हीओओएमआय स्कुटर्समध्ये जीपीएस ट्रॅकर आणि मॉनिटरींग सिस्टिमसह ‘फाइंड माय राइड’ हे फीचर मिळत आहे. हे फीचर ग्राहकाला गर्दीच्या ठिकाणी त्याचे वाहन शोधण्यात मदत करते, ज्यामुळे वाहन शोधणे सोपे जाते.
या दिवशीपासून होणार उपलब्ध
१ डिसेंबरपासून एस१ सिरीजमधील तिन्ही इलेक्ट्रिक स्कुटर्स iVOOMi च्या सर्व डिलरशिप्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. ग्राहक आयसीआयसीआय, बजाज फिनसर्व आणि एलअँडटीपासून ई स्कुटर्ससाठी १०० टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठा मिळवू शकतात.