अॅडवेंचर्स कारप्रेमींची प्रतीक्षा संपली असून जीप इंडियाने लोकप्रिय ऑफ रोड एसयूव्ही जीप कंपसचा नवीन प्रकार लाँच केला आहे. या गाडीला Jeep Compass Trailhawk 2022 असं नाव देण्यात आलं आहे. या गाडीबाबक कंपनीने दावा केला आहे की, ऑन रोड आणि ऑफ रोड अशा दोन्ही ठिकाणी ही गाडी सोयीस्कर आहे. Jeep Compass Trailhawk 2022 किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, गाडीची किंमत ३०.७२ लाख रुपये (एक्स-शोरूम) सह लाँच केली आहे. परंतु आरटीओ, विमा आणि इतर खर्च जोडल्यानंतर ही किंमत वाढेल.
या गाडीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्यात २.० लिटर मल्टीजेट टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन १७० बीएचपी पॉवर आणि ३५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. जे ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने या गाडीत काही कॉस्मेटिक बदलांसह बरेच फीचर्स अपडेट केले आहेत. ज्यामध्ये १०.२५ इंचाचा फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.२५ इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह दिले आहेत. कार कनेक्टेड टेक्नॉलॉजी, पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ३६० डिग्री कार पार्किंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्लीक एलईडी हेडलॅम्प आणि फ्रंट स्लॉटेड ग्रिलमध्ये काही बदल केले आहेत. याशिवाय कंपनीने त्याच्या बोनेटवर अँटी ग्लेअर ग्राफिक्स दिले आहेत, त्यामुळे कार आणखी आकर्षक दिसते.
भारतात लाँच झाल्यानंतर ही कार एमजी हेक्टर, हु्यंदाई टक्सन, टाटा हॅरियर, फॉक्सवॅगन टायगुन, फोर्ड एंडेवर यांच्याशी स्पर्धा करेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ती बुक करू शकता किंवा तुमच्या जवळच्या डीलरशिपवर जाऊन ऑफलाइन देखील बुक करू शकता.