संपूर्ण फॅमिलीसह दूर ठिकाणी फिरता यावे यासाठी नागरिकांकडून कारला मोठी मागणी आहे. आता बाजारात केवळ ५ सिटरच नव्हे तर ७ सिटर कार देखील उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोक आता एकसाथ ट्रॅव्हल करू शकतात. बाजारात अशा कारला जोरदार मागणी आहे. मात्र, कार घरी यायला नागरिकांना वाट पाहावी लागत आहे, कारण त्यांचा प्रतिक्षा कालावधी एक वर्षांपेक्षाही अधिकचा आहे.
या वाहनांचा प्रतीक्षा कालावधी वाढला
महिंद्राच्या या वाहनासाठी २१ महिने वाट पाहावी लागणार
सप्टेंबर महिन्यात महिंद्रा एक्सयूव्ही ७०० ची मागणी वाढली आहे. मात्र तिचा प्रतीक्षा कालावधी खूप मोठा आहे. या वाहनाच्या काही व्हेरिएंटसाठी नागरिकांना 21 महिने वाट पाहावी लागणार आहे. तर नुकतेच लाँच झालेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या काही व्हेरिएंटसाठी देखील ग्राहकांना २१ महिने थांबावे लागणार आहे.
सहा आणि सात सीटमध्ये उपलब्ध असलेल्या स्कॉर्पिओ एन हे वाहन नवीन फ्रेम चेसिसवर आधारित आहे आणि त्या स्कॉर्पिओ क्लासिकपेक्षा अधिक स्पेस आहे. तिची किंमत ११.९९ ते २३.९० लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी आहे.
किआ कॅरेन्ससाठी इतका कालावधी थांबावे लागणार
किआ कॅरेन्स यावर्षी भारतात लाँच झाली होती. या वाहनाच्या निवडक व्हेरिएंटसाठी २० महिन्यांपर्यंतचा प्रतिक्षा कालावधी आहे. त्याचबरोबर, किआ सॉनेटच्या काही व्हेरिएंटसाठी ११ महिन्यापर्यंतचा प्रतिक्षा कालावधी आहे. त्यामुळे, नोंदनी केल्यावर ही कार लगेच मिळणार नसून बराच काळ तिची वाट पाहावी लागणार आहे.
ह्युंडाई क्रेटासाठी ९ महिने वाट पाहावी लागणार
बाजारात ह्युंडाई क्रेटाची मागणी वाढली आहे. ही एक्सयूव्ही नागरिकांच्या जाम पसंतीस उतरत आहे, मात्र तिच्या देखील वाट पाहावे लागणार आहे. क्रटासाठी सध्या ९ महिने वाट पाहावी लागणार आहे. या एक्सयूव्हीचा फेसलिफ्ट वर्जन पुढल्या वर्षी येण्याची शक्यता आहे.
या कारसाठीही वाट पाहावी लागणार
ह्युंडाई वेन्यूसाठी ७ महिने, मारुती अर्टिगासाठी ६ महिने, महिंद्रा थार ६ महिने, मारुती बलेनो ५ महिने आणि टाटा नेक्सॉनसाठी ५ महिन्यांपर्यतचा प्रतीक्षा कालावधी आहे.