Mahindra XEV 9e, BE 6 EVs Surpass 3,000 Deliveries: इंडियन मार्केटमध्ये महिंद्राच्या कारला चांगलीच मागणी आहे. देशात अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर होत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना जोरदार मागणी असते. त्यामुळेच तर ऑटो कंपन्या एसयूव्हीच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत असतात. आता तर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील दाखल होताना दिसत आहे.भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. याच मागणीमुळे आता प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. देशातील आघाडीची एसयूव्हीची उत्पादक कंपनी, महिंद्राने देखील मार्केटमध्ये 2 दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑफर केल्या आहेत.
महिंद्राने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जगात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने २० मार्च २०२५ पासून आतापर्यंत त्यांच्या नवीन ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6 च्या ३००० हून अधिक युनिट्सची डिलिव्हरी केली आहे. हे यश महिंद्राच्या पुढील जनरेशनच्या ईव्हीसाठी एक मजबूत सुरुवात दर्शवते. ग्राहक देखील या कार्सना आपली चांगली पसंती दर्शवित आहे.
योग्य वेळेत विक्रमी डिलिव्हरी
महिंद्रा XEV 9e आणि BE 6 या दोन्ही मॉडेल्सना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बुकिंग डेटानुसार, ५९% ग्राहक XEV 9e आणि ४१% ग्राहक BE 6 ला पसंती देत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांनी या SUV मधील टॉप-स्पेक पॅक थ्री व्हेरियंट निवडला आहे.वाढत्या मागणीमुळे, काही भागात या इलेक्ट्रिक वाहनांसाठी वेटिंग पिरियड आता 6 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, महिंद्रा देशभरात डिलिव्हरी जलद वेगाने करत आहे, जेणेकरून ग्राहकांना जास्त वाट न पाहता त्यांच्या नवीन ईव्हीची राइड घेता येईल.फॅमिली सेफ्टीसाठी क्रॅश टेस्टमध्ये या गाड्यांना 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये कोणते फीचर्स आहेत? किंमती किती आहे? रेंज किती आहे? जाणून घेऊ सविस्तर…
किती आहे किंमत?
महिंद्रा BE 6:
महिंद्रा BE 6 पाच व्हेरिएंटमध्ये इंडियन मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारच्या बेस मॉडेल पॅक वन किंमत १८.९० लाख रुपये आहे. मीड व्हेरिएंट पॅक वनची किंमत २०.५० लाख रुपये आहे. पॅक टूची किंमत २१.९० लाख रुपये आहे आणि पॅक थ्री सिलेक्टची किंमत २४.५० लाख रुपये आहे. BE 6 चे हे सर्व व्हेरिएंट ५९ kWh बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कारचे टॉप मॉडेल, पॅक थ्री, ७९ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. या कारची किंमत २६.९० लाख रुपये आहे.
महिंद्रा XEV 9e:
महिंद्रा XEV 9e ची किंमत २१.९० लाख रुपयांपासून सुरू होते. ही इलेक्ट्रिक कार इंडियन मार्केटमध्ये चार व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कार पॅक टूच्या मिड व्हेरिएंटची किंमत २४.९० लाख रुपये आहे आणि पॅक थ्री सिलेक्टची किंमत २७.९० लाख रुपये आहे. XEV 9e चे हे तीन व्हेरिएंट ५९ kWh बॅटरी पॅकसह मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल पॅक थ्री ७९ किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारच्या या व्हेरिएंटची किंमत ३०.५० लाख रुपये आहे.