Mahindra Armado: महिंद्रा कंपनीच्या आपल्या मालकीची असलेल्या महिंद्रा अँड डिफेन्स सिस्टीम (MDS) ने भारतीय सशस्त्र दलांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘Armado’ या वाहनाची डिलिव्हरी सुरू केली आहे. याची घोषणा शनिवारी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी केली. आर्मडो हे एक आर्मर्ड लाईट स्पेशालिस्ट व्हेईकल आहे.
आनंद महिंद्रा यांनी व्हेइकलची डिलिव्हरी सुरू झाल्याबद्दल एक ट्विट केले आहे. त्या ट्वीटमध्ये उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ” #MhindraDefence, आम्ही नुकतीच भारतातील पहिली आर्मर्ड लाइट स्पेशालिस्ट व्हेइकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. आमच्या सशस्त्र दलांसाठी या व्हेईकलचे डिझाईन व त्याची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे. जय हिंद.” याबाबतचे वृत्त Hindustan Times ने दिले आहे.
आनंद महिंद्रा यांनी या व्हेईकलच्या निर्मितीशी संबंधित असणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. यामध्ये महिंद्रा डिफेन्सचे अध्यक्ष एसपी शुक्ला आणि सुखविंदर हायर आणि त्यांच्या टीमचा समावेश आहे. तसेच लष्करामधील एक कर्नल ज्यांच्या LinkedIn प्रोफाइलनुसार त्यांनी २५ पेक्षा जास्त वर्षे सैन्यात काम केले. २००७ मध्ये त्यांनी कर्नल पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. असे हे स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्नल महिंद्राची दुसरी उपकंपनी असलेल्या डिफेन्स लँड सिस्टिम्स इंडिया (DLSI) चे कार्यकारी संचालक आणि सीईओ आहेत.
जाणून घेऊयात ‘Armado’ व्हेईकलबद्दल
पूर्णपणे भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या या व्हेईकलमध्ये एक ड्रायव्हर आणि ५ प्रवासी बसू शकतात. वाहन निर्मिती करणाऱ्या वेबसाईटने त्यांच्या वेबसाईटवर नमूद केले आहे की, १००० किलो इतक्या वजनाचा भार पेलण्याची या वाहनाची क्षमता आहे. तसेच क्षमतेपेक्षा ASLV हे आणखी अतिरिक्त ४०० किलो वजन वाहून नेऊ शकते.
हे ASLV वाहन उपयोग दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी, खुल्या आणि वाळवंटासारख्या भागामध्ये छापेमारी करण्यासाठी तसेच शोध मोहिमांमध्ये वापरले जाऊ शकते. स्पेशल फोर्सेस आणि क्विक रिअॅक्शन टीम देखील याचा वापर त्यांचे रेग्युलर ऑपरेशन्स, शस्त्रात्र वाहून नेणे, सीमेवर गस्त घालणे इत्यादींसाठी करू शकतात.
Armado या आर्मर्ड लाईट स्पेशालिस्ट व्हेईकलला B७ लेव्हलचे आणि STANAG लेव्हल -२ पर्यंतचे बॅलेस्टिक संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की, आर्मर कवच भेदू शकणाऱ्या रायफल्स देखील याला काही करू शकत नाहीत. या व्हेईकलला सर्व बाजूंनी ग्रेनेड आणि बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण देण्यात आले आहे.
महिंद्राच्या Armado मध्ये ३.२ लिटरचे मल्टी फ्युएल डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे २१६ Hp इतकी पॉवर जनरेट करते. यामध्ये ६-स्पीड गिअरबॉक्ससह पॉवर चारही चाकांमध्ये पाठवण्यासाठी ४X४ सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. हे वाहन केवळ १२ सेकंदात ० ते १६० किमी प्रतितास इतके वेग पकडू शकते.