भारतीय वाहन बाजारात एसयूव्हींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या सेगमेंटमध्ये मिनी, कॉम्पॅक्ट, सब ४ मीटर आणि फुल साईज एसयूव्ही विकल्या जातात. या सगमेंटच्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या कार्सचा आणि कंपन्यांचा दबदबा आहे. कॉम्पॅक्ट आणि सबकॉम्पॅक्ट कार्सच्या सेगमेंटमध्ये गेल्या एक वर्षापेक्षा अधिक काळ टाटा नेक्सॉन या कारचा दबदबा आहे. गेल्या १३-१४ महिन्यांपासून ही कार भारतातली बेस्ट सेलिंग एसयूव्ही आहे. परंतु आता एका मारुती कारने नेक्सॉनचं वर्चस्व संपवलं आहे. मारुती ब्रेझाने विक्रीच्या बाबतीत टाटा नेक्सॉनला मागे टाकला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये असं दुसऱ्यांदा घडलं आहे.
गेल्या महिन्यात (फेब्रुवारी २०२३) मारुती ब्रेझा ही देशातली सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही ठरली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या १५,७८७ युनिट्सची विक्री केली आहे. तर टाटा नेक्सॉनच्या १३,९१४ युनिट्सची विक्री झाली आहे. दोन्ही कार्सच्या विक्रीत १,८७३ युनिट्सचा फरक आहे. एसयूव्हींच्या सेगमेंटमधील ५० टक्के हिस्सा या दोन कार्सचा आहे.
फेब्रुवारी महिन्यात टाटा पंच ही कार विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या ११,१६९ युनिट्सची विक्री केली आहे. तर ह्युंदाई क्रेटा ही कार १०,४२१ युनिट्स विक्रीसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर ९,९९७ युनिट्स विक्रीसह ह्युंदाई वेन्यू ही कार पाचव्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा >> आनंदाची बातमी! Tata Motors च्या ‘या’ वाहनांवर मिळतोय भरघोस डिस्काउंट, होणार ‘मोठी’ बचत
ब्रेझासाठी ६१,५०० बुकिंग्स
मारुतीच्या अनेक कार्स बाजारात धुमाकूळ घालत आहेत. मारुती अर्टिगाचे ९४,००० बुकिंग्स पेंडिंग आहेत. तर ग्रँड विटारा कारचे ३७,००० युनिट्स बुकिंग्स पेंडिंग आहेत. मारुती सुझुकी ब्रेझासाठी देखील हजारो बुकिंग्स मिळत आहेत. या कारसाठी ६१,५०० ग्राहक वेटिंगवर आहेत.