Maruti Suzuki First Electric Car: ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत दाखल करीत आहेत. आता लवकरच देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत दाखल करणार आहे. मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची प्रत्येक जण वाट पाहत आहेत.

मारुती सुझुकी ही देशातील नंबर वन कार कंपनी आहे आणि ती दर महिन्याला जास्तीत जास्त कार विकते. मारुती सुझुकीचे जवळजवळ प्रत्येक विभागात वर्चस्व आहे. मारुतीच्या कार्सला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आता कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. अलीकडेच ऑटो एक्सपो २०२५ मध्ये ही कार दाखवण्यात आली होती, पण या कारच्या लाँचिंगबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. रिपोर्ट्सनुसार, काही डीलरशिपवर त्याचे बुकिंग सुरू झाले आहे. ही कार २५,००० रुपये टोकन रक्कम देऊन बुक केली जात आहे. परंतु, आतापर्यंत कंपनीकडून बुकिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार कधी होणार लाँच?

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती ई-विटारा मे महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. मारुती ई-विटारा तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये डेल्टा, झेटा आणि अल्फा प्रकारात लाँच केली जाईल. मारुती ई-विटारा दोन बॅटरी पॅक पर्यायांसह सादर केली जाणार असल्याची माहिती आहे.  या कारमध्ये ४९ किलोवॅट क्षमतेचा आणि ६१ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही इलेक्ट्रिक कार मोठ्या बॅटरी पॅकसह ५०० किलोमीटरची रेंज देऊ शकते.

या इलेक्ट्रिक एसयूव्हीला विविध प्रकारचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) देण्यात आले आहेत, जे तिचा लूक स्टायलिश करतात. नवीन eVitara चा ग्राउंड क्लीयरन्स १८० मिमी असेल. याशिवाय, त्याची लांबी ४,२७५ मिमी, रुंदी १,८०० मिमी, उंची १,६३५ मिमी, व्हीलबेस २,७०० मिमी आणि R१८ एरोडायनामिक अलॉय व्हील्स त्यात दिसतील. त्याच्या पुढच्या आणि मागच्या दिव्यात ३-पॉइंट मॅट्रिक्स एलईडी डीआरएल असेल. सुरक्षेसाठी त्यात ७ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरे, लेव्हल-२ ADAS, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम असेल.

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ही कार १९ ते २० लाख रुपयांमध्ये येऊ शकते. नवीन ई-विटारा नेक्सा ब्लू, ग्रे, सिल्व्हर, व्हाइट, रेड आणि ब्लॅक सिंगल-टोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. भारतात ही कार ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल.