Best Selling 7-Seater Car: देशात सात सीटर कारची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. अनेक जण आपल्या कुटुंबीयांचा विचार करून कार खरेदी करतात. यात मोठं कुटुंब असल्यास अनेक लोक सात सीटर कार खरेदी करण्यास पसंती दर्शवतात. महिंद्रा स्कॉर्पिओ हे या सेगमेंटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, परंतु एक अशी कार आहे, जिचा दबदबा बाजारपेठेत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि ही कार वर्षभर तिच्या सेगमेंटमधील विक्रीच्या बाबतीत नंबर-वन राहिली आहे. या कारची गेल्या महिन्यात दणक्यात विक्री झाली असून तिची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ही कार चांगली कामगिरी करत आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे मार्च २०२५ मधील विक्रीचे आकडे समोर आले आहेत, ज्यामध्ये कंपनीने सुमारे दोन लाख कार विकल्या आहेत. कंपनीच्या विक्रीत विविध श्रेणींमध्ये घट झाली असली तरी मारुती सुझुकी अजूनही सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी आहे. या यशात ब्रेझा आणि एर्टिगासारख्या प्रमुख मॉडेल्सचे मोठे योगदान आहे. मार्चमध्ये एर्टिगा सर्वाधिक विक्री होणारी ७ सीटर कार ठरली आहे. मारुती सुझुकीची खिशाला परवडणारी सात सीटर एमपीव्ही Ertiga ही सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

मारुती सुझुकीच्या एकूण विक्रीत ३ टक्क्यांनी वाढ

मार्चमध्ये मारुती सुझुकीची एकूण विक्री ३ टक्क्यांनी वाढून १,९२,९८४ झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात १,८७,१९६ होती. यापैकी कंपनीने देशांतर्गत बाजारात १,५०,७४३ प्रवासी वाहने विकली, तर मार्च २०२४ मध्ये ही संख्या १,५२,७१८ होती.

अल्टो आणि एस-प्रेसोच्या विक्रीत घट

तर दुसरीकडे अल्टो आणि एस-प्रेसोच्या विक्रीत घट झाली आहे. मार्चमध्ये त्यांची विक्री ११,६५५ पर्यंत घसरली, जी गेल्या वर्षी मार्चमध्ये ११,८२९ होती. त्याचप्रमाणे बलेनो, डिझायर, इग्निस आणि स्विफ्टसारख्या कॉम्पॅक्ट कारची विक्रीही मार्चमध्ये कमी होऊन ६६,९०६ झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ६९,८४४ होती. भारतीय कार बाजारात एसयूव्ही, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एमपीव्हीसारख्या मोठ्या कारची मागणी वाढली आहे, त्याचा परिणाम मारुतीच्या विक्रीवरही दिसून येत आहे. कंपनीच्या ग्रँड विटारा, ब्रेझा, एर्टिगा आणि एक्सएल६ सारख्या मोठ्या वाहनांची विक्री मार्चमध्ये वाढून ६१,०९७ झाली, जी गेल्या वर्षी मार्चमध्ये ५८,४३६ होती.

मार्चमध्ये मारुतीच्या व्हॅन इकोची विक्री १०,४०९ वर पोहोचली, जी गेल्या वर्षी मार्चमध्ये १२,०१९ होती. याशिवाय, कंपनीच्या हलक्या व्यावसायिक वाहन सुपर कॅरीची विक्रीही गेल्या वर्षी मार्चमध्ये ३,६१२ च्या तुलनेत २,३९१ वर घसरली. मार्च २०२५ मध्ये मारुतीची निर्यातही वाढून ३२,९६८ वर पोहोचली, तर गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या २५,८९२ होती. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मारुतीने एकूण २२,३४,२६६ गाड्या विकल्या, तर मागील आर्थिक वर्षात हा आकडा २१,३५,३२३ होता. कंपनीने २० लाखांहून अधिक वाहन विकल्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.