जर तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करा, कारण देशातील सर्वात इंधन कार्यक्षम एसयूव्ही भारतात सादर होणार आहे. वास्तविक, मारुती सुझुकी आपल्या ग्रँड विटारा वाहनाद्वारे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनीने याच्या फीचर्सचा खुलासा आधीच केला आहे पण त्याची किंमत लाँच झाल्यावरच जाहीर केली जाईल. कंपनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ग्रँड विटारा सादर करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक मायलेज एसयूव्ही
मारुतीची ही फ्लॅगशिप एसयूव्ही दोन इंजिन पर्यायांसह आणण्यात आली आहे. यात स्ट्राँग हायब्रिड टेक्नॉलॉजीसह १.५-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे ई-सीव्हीटीसह जोडलेले आहे. हे तेच इंजिन आहे जे टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरवर देखील आढळते. मारुती सुझुकी असा दावा करत आहे की, ही भारतातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम एसयूव्ही आहे जी २७.९७ किलोमीटर प्रति लिटर वितरीत करते.
(हे ही वाचा : ‘Enigma’ने इलेक्ट्रिक दुचाकीसह सादर केल्या सहा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर )
फीचर्स
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या फीचर्सची एक लांबलचक यादी आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हवेशीर फ्रंट सीट्ससह ९.०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. वाहनामध्ये ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरा, सहा एअरबॅग्ज, इएसपी, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, टीपीएमएस सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत.
किंमत
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत सुमारे १० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर त्याच्या मजबूत हायब्रिड मॉडेलची किंमत १८-१९ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. सादर झाल्यानंतर, ग्रँड विटारा टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर, ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टोस सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.