भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा भारतीय वाहन बाजारात मोठा दबदबा आहे. मारुतीच्या कारला बाजारात मोठी मागणी आहे. परवडणारी किंमत, मायलेज, फीचर्स, लुक डिझाईन यामुळे मारुती सुझुकीच्या कार्सना भारतीय बाजारात मोठी पसंती मिळते. कंपनी बाजारपेठेत आपले नवनवे माॅडेल्स सुध्दा लाँच करीत असते. आता कंपनीच्या एका कारला बाजारात इतकी तुफान मागणी दिसून येत आहे की, या तगड्या मागणीमुळे कंपनीकडे कारची डिलिव्हरी पेंडिंग आहे.
आजकाल मारुती सुझुकीच्या काही निवडक वाहनांना खूप मागणी आहे. विशेषत: शहरांमध्ये सीएनजी वाहनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. माहितीनुसार, मारुतीला जुलै २०२४ पर्यंत त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सात-सीटर कारच्या CNG आवृत्तीचे सुमारे ४३ हजार गाड्यांची डिलीव्हरी करायची आहे.
मारुतीला एर्टिगा सात-सीटर सीएनजीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग मिळाले आहे. मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्या ऑर्डरमुळे, कंपनीकडे या कारच्या ४३ हजार गाड्यांची डिलिव्हरी बाकी आहे. XL6, Grand Vitara, Brezza, Frontex, Baleno, DZire, WagonR, Celerio, Eeco, S-Presso आणि Alto K10 यांचा समावेश असलेल्या १२ CNG मॉडेलपैकी मारुती एर्टिगा एक आहे.
(हे ही वाचा: ३५ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ६५ किमी; स्वस्तात खरेदी करा ‘या’ बाईक्स अन् स्कूटर, पाहा यादी)
CNG मध्ये जबरदस्त मायलेज
मारुती एर्टिगा सीएनजी VXi (O) आणि ZXi (O) या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या आवृत्तीमध्ये १.५-लिटर, चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते जे केवळ पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. पेट्रोल मोडमध्ये ही कार १०२bhp पॉवर आणि १३६Nm टॉर्क जनरेट करते, तर CNG मोडमध्ये ती ८७bhp पॉवर आणि १२१Nm टॉर्क देण्यास सक्षम आहे. ही सात-सीटर कार सीएनजी मोडमध्ये २६.११ किमी मायलेज देते.
आश्चर्यकारक वैशिष्ट्ये
कारच्या विविध प्रकारांमध्ये, तुम्हाला सात-इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह कनेक्टेड कार तंत्रज्ञान (टेलीमॅटिक्स) मिळते. त्याच्या सेफ्टी सूटमध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प्स, चार एअरबॅग्ज, EBD सह ABS, ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ESP सह हिल होल्ड कंट्रोल यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. कंपनीने कारमध्ये क्लायमेट कंट्रोल एसी आणि पॅडल शिफ्टर्स सारखी प्रगत वैशिष्ट्ये देखील दिली आहेत.
किंमत जाणून घ्या
Ertiga च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारचे बेस व्हेरिएंट ८.६९ लाख रुपये एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. तर कारचा टॉप व्हेरिएंट १३.०३ लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत उपलब्ध आहे.