भारतात हॅचबॅक आणि एसयूव्ही कार्सची विक्री वाढली असली तरी काही सेडान कार्सची चांगलीच विक्री होत आहे. भारतीय वाहन बाजारातील सेडान कार्सच्या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी डिझायरचा गेल्या अनेक वर्षांपासून दबदबा आहे. हा दबदबा डिझायरने ऑगस्ट महिन्यातही कायम ठेवला आहे. ऑगस्ट महिन्यातील वाहनांच्या विक्रीचे आकडे पाहता विक्रीच्या बाबतीत दुसरी कुठलीही सेडान कार डिझायरच्या आसपास नाही. गेल्या महिन्यात मारुतीने डिझायरच्या १३,२९३ युनिट्सची विक्री केली आहे. तर या यादीत ह्युंदाई ऑरा ही कार दुसऱ्या नंबरवर आहे. ह्युंदाईने ऑगस्ट २०२३ मध्ये या कारच्या ४,८९२ युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजेच दोन्ही कार्सच्या विक्रीत तब्बल ८,४०१ युनिट्सचा फरक आहे.
देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० सेडान कार्सच्या यादीत डिझायर आणि ऑरानंतर होंडा अमेझ, टाटा टिगॉर, ह्युंदाई वेर्ना, फोक्सवॅगन वर्ट्स, स्कोडा स्लाव्हिया, होंडा सिटी, मारुती सियाझ आणि टोयोटा कॅमरी या कार्सचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात होंडाने अमेझ या सेडानच्या ३,५६४ युनिट्सची विक्री केली आहे. तर टाटा मोटर्सने टिगॉरचे २,९४७ युनिट्स विकले आहेत. ह्युंदाई वेर्ना २,५७६ युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या नंबरवर आहे. त्यापाठोपाठ फोक्सवॅगन वर्ट्स (२,१४० युनिट्स), स्कोडा स्लाव्हिया (१,६५७ युनिट्स), होंडा सिटी (१,४९४ युनिट्स), मारती सियाज (८४९ युनिट्स), टोयोटा कॅमरी (१८१ युनिट्स) या कार्सची देशात उत्तम विक्री झाली आहे.
हे ही वाचा >> VIDEO: फक्त २१ हजारांमध्ये बुक करा टाटाची ‘ही’ कार; गुरूवारी लॉन्च होणार, फीचर्स एकदा पाहाच
देशातील बेस्ट सेलिंग सेडान कार मारुती डिझायरची किंमत ६.५१ लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या टॉप मॉडेलची किंमत ९.३९ लाख रुपये इतकी आहे. यामध्ये १.२ लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे ९० पीएस पॉवर आणि ११३ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे, तसेच ५-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो. ही कार सीएनजी इंजिनसह उपलब्ध आहे. सीएनजीवर या कारचं इंजिन ७७ पीएस पॉवर आणि ९८.५ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. CNG व्हेरियंट फक्त ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतं.