मारुती सुझुकी लवकरच भारतात नवी इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. कंपनीच्या ४१व्या अन्युअल जनरल मीटिंगमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आरसी भार्गव यांनी सांगितले की नवी इलेक्ट्रिक कार अपर सेगमेंटमध्ये लाँच करण्यात येईल.
गेल्या अनेक दिवसांपासुन मारुती सुझुकीच्या या कारची चर्चा आहे. याची किंमत ७ ते १० लाखांपर्यंत असेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एका मुलाखतीत आरसी भार्गव यांनी सांगितले की, “नव्या इलेक्ट्रिक कारची किंमत १० लाखांपेक्षा जास्त असेल. इवी उत्पादन गुजरातमध्ये सुझुकी मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये होईल आणि ही कार २०२४-२५ पर्यंत भारतात लाँच होईल अशी आशा आहे.”
आणखी वाचा – डिझेल गाड्यांची क्षमता अल्पावधीमध्ये का खालावते? संशोधनामधून समोर आलं कारण
येत्या २ वर्षात देशात अनेक इलेक्ट्रिक कार होणार लाँच
मारुती सुझुकीसह टाटा मोटर्स आणि महिंद्रा देखील इवी पोर्टफोलियोचा विस्तार वेगाने करत आहेत. एमजी ऑटो, हुंडई इंडिया आणि किआ इंडिया या कंपन्यासुद्धा इलेक्ट्रॉनिक गाडीलाँच करण्याची तयारी करत आहेत. पुढील २ वर्षात भारतात २५ नव्या इलेक्ट्रिक कार लाँच होण्याची शक्यता आहे.
देशातच बनवली जाणार मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कारची बॅटरी
आरसी भार्गव यांनी सांगितले की, ” या नव्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांची पसंती मिळेल अशी आम्हाला आशा आहे. ही कार काळजीपूर्वक डिझाईन करण्यात आली आहे. कारची बॅटरी देशातच बनवली जाणार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वदेशीकरणामध्ये आमचा हातभार लागेल. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन गुजरातमध्ये बॅटरी प्लांट उभारत आहे. मारुती सुझुकीची मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने (SMC) अलीकडेच गुजरातमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई- ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरीच्या निर्मितीसाठी एक प्लांट स्थापन केला आहे. ज्यात ७,३०० कोटी रुपये गुंतवले आहेत. २८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.