Maruti Suzuki Recalls Vehicles: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) काही बिघाडामुळे तब्बल १७ हजार ३६२ युनिट्स परत मागवत (Car Recall) आहे. या रिकॉलमध्ये कंपनीच्या सहा मॉडेलचा समावेश आहे. कंपनीच्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया कंपनीने या गाड्या परत मागविण्याचे कारण काय, आणि यात कोणकोणत्या गाड्यांचा समावेश आहे.
गाड्या परत मागविण्याचे कारण काय?
कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने सांगितले की, या मॉडेल्समध्ये एअरबॅगशी संबंधित दोष असू शकतो, त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी कंपनी या मॉडेल्स परत बोलावित आहे. हा दोष रिकॉलद्वारे दुरुस्त केला जाईल. हे सर्व मॉडेल ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान तयार करण्यात आले होते.
(हे ही वाचा : मारुती सुझुकीच्या ग्राहकांना झटका! मारुतीने सर्वच कारच्या किंमती वाढवल्या)
कंपनी ‘या’ गाड्या परत बोलावणार
भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी सांगितले की, ते त्यांच्या सहा मॉडेल अल्टो K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara मधील १७,३६२ युनिट्स परत मागवत आहेत.
मारुती सुझुकीने पुढे सांगितले की, परत मागवलेल्या कारची कंपनीच्या सेवा केंद्रांवर तपासणी केली जाईल. आवश्यक असल्यास, दोषपूर्ण एअरबॅग कंट्रोलरचा भाग बदलला जाईल. या दोषामुळे अपघात झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रीटेन्शनर त्यांचे काम करण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. तसेच संशयित वाहनांच्या ग्राहकांना प्रभावित भाग बदलेपर्यंत वाहन चालवू नका किंवा वाहन वापरू नका, असे आवाहनही कंपनीने केले आहे.