सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाकडे टू-व्हिलर असते. देशामध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत ज्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन मॉडेल्स बाजारामध्ये लॉन्च करत असतात. अशातच मे २०२३ या महिन्यामध्ये एकूण १४.७१ लाख दुचाकी युनिट्सची विक्री झाली आहे. तर यामध्ये कोणत्या पाच कंपन्यांचा समावेश आहे त्याची माहिती जाणून घेऊयात.
मे २०२३ मध्ये दुचाकींच्या एकूण १४.७१ लाख युनिट्सची विक्री झाली. तर मे २०२२ १२.५३ लाख युनिट्सची विक्री झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या विक्रीमध्ये १७.४ टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
मे २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारे दुचाकी ब्रँड
Royal Enfield : मे २०२३ या महिन्यामध्ये रॉयल एन्फिल्ड कंपनीने देशांतर्गत ७०,७९५ युनिट्सची विक्री केली आहे. टॉप ५ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कंपन्यांमध्ये रॉयल एन्फिल्ड पाचव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीने ५३५२५ युनिट्सची विक्री केली होती. क्लासिक ३५० ही भारतातील सार्वधिक विक्री होणारी गाडी आहे.
Bajaj : मे २०२२ मध्ये बजाज कंपनीने ९६,१०३२युनिट्सची विक्री केली होती. तर मे २०२३ मध्ये कंपनीने १,९४,६८४ युनिट्सची विक्री केली होती. या विक्रीच्या संख्येमुळे कंपनी टॉप ५ मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच कंपनीच्या विक्रीत यंदा १०२.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
TVS : मे २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप ५ दुचाकी ब्रँडमध्ये तिसऱ्या स्थानावर टीव्हीएस कंपनीचा समावेश आहे. कंपनीने मे २०२३ मध्ये २,५२,६९० युनिट्सची विक्री केली होती तर, मे २०२२ मध्ये १,९१,४८२ युनिट्सची विक्री केली होती.
Honda : होंडा कंपनी या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. होंडा कंपनीने सर्वाधिक विक्री होणाऱ्या Activa ला अपडेट केलं होते. तरीदेखील या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणे कंपनीला शक्य झालेले नाही. मे २०२३ मध्ये कंपनीने ३,११,१४४ युनिट्सची विक्री केली तर मे २०२२ मध्ये ३,२०,८५७ युनिट्सची विक्री केली. कंपनीच्या विक्रीमध्ये मागील वर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी घट झाली.
Hero MotoCorp: मे २०२३ मध्ये सर्वाधिक दुचाकी युनिट्सची विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये पहिल्या स्थानावर हिरो मोटरकॉर्प कंपनी आहे. हिरो कंपनीने मे २०२३ या महिन्यामध्ये ५,०८,३०९ युनिट्सची विक्री केली आहे. तरी मे २०२२ मध्ये ४,६६,४६६ युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच यंदा कंपनीच्या विक्रीमध्ये ८.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये स्प्लेंडर या दुचाकीची सर्वाधिक विक्री झाली आहे.