मर्सिडीज बेंझ इंडिया ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने म्हणजेच Mercedes-Benz India ने देशामध्ये सातव्या जनरेशनची SL लॉन्च केली आहे. कंपनीने मर्सिडीज-AMG SL 55 भारतात लॉन्च केली आहे. याचे बुकिंग सुरू असून या ड्रॉप-टट्रॉप रोडस्टरला भारतात मर्यादित संख्येमध्ये CBU द्वारे आयात केले जाईल.
इंजिन आणि गिअरबॉक्स
नवीन मर्सिडीज-AMG SL 55 मध्ये ४.० लिटरचे, ट्वीन टर्बोचार्ज, V8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ४७० बीएचपी आणि ७०० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ९-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. AMG SL 55 ३.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारचा टाॅप स्पीड हा २९५ किमी प्रतितास इतका आहे. यामध्ये रिअर एक्सल स्टिअरिंग देखील मिळते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
डिझाईन आणि फीचर्स
Mercedes-AMG SL 55 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास ही आधुनिक कार मर्सिडीज बेंझ मॉडेलच्या टेक्नॉलॉजीसह मूळ SL च्या स्पोर्टीनेसला जोडते. तसेच ८ exterior पेंट स्कीममध्ये कार ऑफर करण्यात आले आहे. कारचे रूफ उघडायला किंवा बंद करायला १६ सेकंदाचा कालावधी लागतो. तसेच यामध्ये MBUX सह डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेसह ११.९ इंचाची टचस्क्रीन मिळते.
किंमत आणि कोणाशी करणार स्पर्धा
मर्सिडीज बेंझ इंडियाने मर्सिडीज-AMG SL 55 भारतात लॉन्च केली आहे. ज्याची सुरूवातीची (एक्स-शोरूम) किंमत २.३५ कोटी रूपये इतकी आहे. AMG SL 55 या कारची स्पर्धा Lexus LC 500h, Porsche 911 Carrera S Cabriolet इत्यादी कार्सशी होणार आहे.